रेश्मा राईकवार
दीड वर्षांनंतर या आठवडय़ात चित्रपटगृहे पुन्हा सुरू होणार आहेत. या काळात रखडलेले चित्रपट व्यवसायाचे चाक पुन्हा वेगाने धावण्याच्या प्रतीक्षेत आहे. हिंदीतील मोठमोठय़ा रखडलेल्या चित्रपटांच्या निर्मात्यांनी आता तारखा जाहीर के ल्या आहेत. एकीक डे देशभरात जिथे जिथे चित्रपटगृहे सुरू झाली आहेत तिथे हॉलीवूडपट आणि दाक्षिणात्यपट सातत्याने प्रदर्शित के ले जात असून त्याला प्रेक्षकांचा मोठय़ा प्रमाणावर प्रतिसादही मिळतो आहे. मात्र मुंबई-महाराष्ट्रातील चित्रपटांची आर्थिक गणितं जुळून येत नाहीत तोवर आपला व्यवसाय गती घेणार नाही हे लक्षात आलेल्या हिंदी चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटगृहे सुरू होण्याची तारीख जाहीर होताच कं बर कसली. हिंदीतील छोटय़ा-मोठय़ा चित्रपटांनीही अगदी पुढच्या वर्षीपर्यंतचं आपलं प्रदर्शनाचं वेळापत्रक जाहीर केलं आहे, त्या तुलनेत मराठी चित्रपटांची मोजकीच नावं जाहीर झाली आहेत. दिवाळीत प्रदर्शित होणारे चित्रपट आणि त्यांना मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद लक्षात घेऊन मगच मराठीतील मोठे चित्रपट प्रदर्शित होतील, असे ट्रेड विश्लेषकांचे म्हणणे आहे.
गेल्या वर्षी मार्चमध्ये करोनामुळे टाळेबंदीची घोषणा झाली तेव्हा आणि त्यापुढील काही दिवसांत मराठीत अनेक मोठे चित्रपट प्रदर्शनाच्या तयारीत होते. ‘पांघरूण’, ‘मी वसंतराव’, ‘पावनखिंड’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘दगडी चाळ २’, ‘दे धक्का २’ अशा अनेक मोठय़ा चित्रपटांची नावं चर्चेत होती. याशिवाय, ‘बस्ता’, ‘डार्लिग’सारखे अनेक छोटे-मोठे चित्रपटही प्रदर्शनासाठी धडपडत होते. त्यातले अगदीच एक-दोन चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाले, तर इतर अनेक मराठी चित्रपट प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत आहेत. तरीही २२ ऑक्टोबरला चित्रपटगृहे पुन्हा कार्यरत होणार हे जाहीर झाल्यानंतर नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांत मिळून सहा मराठी चित्रपटांची घोषणा झाली आहे. याच काळात हिंदीत दहा ते बारा चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. ‘‘या आठवडय़ात राज्यभरातील चित्रपटगृहे सुरू होणार आहेत, मात्र पहिल्या किं वा दुसऱ्या आठवडय़ात मराठी चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता कमी आहे,’’ असे मत चित्रपट वितरक राहुल अक्सर यांनी व्यक्त के ले. हिंदीत मोठमोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, ते लक्षात घेऊनच मराठी चित्रपट निर्मात्यांना प्रदर्शनाचे नियोजन करावे लागणार आहे. नोव्हेंबरमध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर ‘सूर्यवंशी’ हा हिंदीतला मोठा चित्रपट प्रदर्शित होतो आहे, त्यामुळे त्याच्यानंतरच्या आठवडय़ातच मराठी चित्रपट प्रदर्शित होतील, असे अक्सर यांनी सांगितले. तर मराठी चित्रपट निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शनाबाबत सावध भूमिका घेतली आहे, असे मत ट्रेड विश्लेषकांनी व्यक्त के ले आहे.
२२ ऑक्टोबरला चित्रपटगृहे पूर्ण क्षमतेने सुरू होणार नाहीत. अर्ध्या क्षमतेने सुरू होणाऱ्या या चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी पूर्ण भाडे भरावे लागणार आहे. शिवाय, प्रेक्षक किती प्रमाणात चित्रपटगृहात चित्रपट पाहायला येणार, याबाबतही साशंकता असल्याने मराठी चित्रपटांचे निर्माते सावध भूमिका घेताना दिसत आहेत, असे जाणकारांचे म्हणणे आहे. हिंदीतला एखादा मोठा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यासाठी प्रेक्षक चित्रपटगृहापर्यंत आला की मग मराठीतील मोठय़ा चित्रपटांच्या प्रदर्शनाबाबतचा निर्णय घेतला जाईल. सध्या ज्या चित्रपटांच्या तारखा प्रदर्शित झाल्या आहेत तेही मोठेच चित्रपट आहेत, असे मत वितरक अंकित चंदरामाणी यांनी व्यक्त के ले. मराठी चित्रपटांची सुरुवात १२ नोव्हेंबरपासून होणार आहे. ‘जयंती’ हा पहिला मराठी चित्रपट प्रदर्शित होईल. त्यानंतर १९ नोव्हेंबरला हेमंत ढोमे दिग्दर्शित बहुचर्चित, बहुप्रतीक्षित ‘झिम्मा’ हा चित्रपट १९ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. नोव्हेंबर आणि डिसेंबर मिळून मराठीतील चांगले सहा मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत, ही चांगली सुरुवात असल्याचेही चंदरामाणी यांनी स्पष्ट के ले. निर्मात्यांनी मराठी चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी घेतलेली सावध भूमिका योग्यच असल्याचे मत त्यांनी व्यक्त के ले. नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये हिंदीतही दोन-तीन मोठे चित्रपट वगळता अन्य मोठे चित्रपट हे जानेवारीत लागोपाठ प्रदर्शित होत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले. डिसेंबरच्या अखेरीस प्रदर्शित होणारा ‘जर्सी’, ‘पुष्पा’ हा दाक्षिणात्य चित्रपट आणि ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘राधेश्याम’, ‘पृथ्वीराज चौहान’, ‘आरआरआर’ असे चित्रपट जानेवारीत एकामागोमाग एक प्रदर्शित होणार आहेत. या गर्दीत मराठी चित्रपटांना योग्य ते शोज आणि चित्रपटगृहे मिळवणे कठीण होऊन बसणार आहे. अशा वेळी जानेवारीत चित्रपट प्रदर्शित करण्याचा सल्ला आम्हीही निर्मात्यांना देऊ शकणार नाही, असे चंदरामाणी यांनी सांगितले. दिवाळीनंतर आणि पुढे जानेवारी-फे ब्रुवारीनंतरच मोठय़ा मराठी चित्रपटांना प्रदर्शित होण्यासाठी वाव मिळेल, असे जाणकारांचे मत आहे.
नोव्हेंबर – डिसेंबरमध्ये प्रदर्शित होणारे मराठी चित्रपट
* जयंती – १२ नोव्हेंबर
* झिम्मा – १९ नोव्हेंबर
* गोदावरी – ३ डिसेंबर
* डार्लिग – १० डिसेंबर
* फ्री हिट दणका – १७ डिसेंबर * दे धक्का २ – ३१ डिसेंबर