उस्ताद झाकीर हुसेन यांच्या तबल्याच्या तालानिशी शुक्रवारपासून सुरू झालेला उपवन कलाउत्सव अपेक्षेहून अधिक यशस्वी होणार असल्याची चिन्हे दुसऱ्याच दिवशी दिसू लागली आणि चर्चेचा नूर बदलला. दक्षिण मुंबईत भरणाऱ्या काळा घोडा महोत्सवाशी या उपवन उत्सवाची तुलना उघडपणे होऊ लागली आणि निष्कर्ष एकच निघाला- ठाण्यातला हा उत्सव काळा घोडा अथवा कोणत्याही अन्य कला उत्सवापेक्षा मोठा आहे!
ठाणेकरांचा उत्साह आणि बोरिवलीपासून बदलापूपर्यंतच्या परिसरानं त्यात घेतलेला सहभाग, हा या उत्सवाचा मानवी चेहरा आहे. कुतूहल म्हणून इथं आलेले लोक काही ना काही नवं पाहून गेल्याचं समाधान मिळवत आहेत. काळा घोडा आर्ट फेस्टिव्हल म्हणून जो उत्सव दक्षिण मुंबईचा ‘कला विभाग’ म्हणवून घेणाऱ्या भागात भरतो, त्या उत्सवामुळे त्या परिसरात अगोदरपासूनच दुकान मांडलेल्या अनेकांचं भलं होतं. सुमारे १०० स्टॉल्सची जत्रा तर तिथे दक्षिण मुंबईतही असते, पण ठाण्यात स्टॉल्सची संख्या सुमारे ३०० आहे. याउलट ठाण्याच्या उपवन तलावाभोवतीची मोठी मोकळी जागा आणि अद्यापही येऊर डोंगराच्या हिरवाईचं पाठबळ टिकून असल्यामुळे रम्य वाटणारा परिसर, हे ‘उपवन आर्ट फेस्टिव्हल’चं वैशिष्टय़ ठरलं आहे. ही जागा, केवळ ३०० हून अधिक स्टॉलसाठीच नव्हे, तर सुप्रसिद्ध नामवंत गायक-वादकांच्या कार्यक्रमांसाठी एक मोठं खुलं प्रेक्षागार, नवोदितांसाठी सहा वेगवेगळ्या प्रकारचे खुले मंच, नवनवीन कलाकौशल्यं शिकू इच्छिणाऱ्यांसाठी कार्यशाळांची जागा आणि शिवाय कलाविषयक व्याख्यानांसाठी निराळं बंदिस्त सभागार, पन्नासहून अधिक जगप्रसिद्ध चित्रकारांच्या कलाकृतींसाठी तात्पुरतं का होईना, पण प्रशस्त वातानुकूलित कलादालन आणि मुख्य म्हणजे मुबलक पार्किंग यांना ही उपवनलगतची जागा पुरून उरते आहे.
दिल्ली, बंगळुरू, कोलकाता या शहरांतले एकंदर १५ दृश्यकलावंत चित्रकलेच्या प्रदर्शनानिमित्तानं ठाण्यात तीन-चार दिवस मुक्कामाला होते. त्यापैकी अनेकांना याआधी ठाणे माहीतदेखील नव्हतं. ‘ठाण्याचा प्रतिसाद थक्क करणारा आहे’ असं यापैकी बहुतेकांनी बोलून दाखवलं. ज्येष्ठ चित्रकार सुधीर पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली ऋ चा मेहता यांनी भरवलेल्या कलाप्रदर्शनाखेरीज आणखी २५ ते ३० चित्रकारांनी पैसे खर्चून आपापल्या कलाकृतींचे स्टॉल इथं लावले आहेत. शिवाय हस्तकलांचे किंवा कलावस्तूंचे स्टॉल निराळे. कोणत्याही विक्रीपर प्रदर्शनात किं वा व्यापारी पेठेत वगैरे दिसणारे काही स्टॉल्स इथं आहेत, पण त्यांच्यापेक्षा नावीन्य आहे ते कलाकारांनी या महोत्सवाकडे एक महत्त्वाची व्यवसाय-संधी म्हणून पाहिलं आहे, याचं. मुंबईच्या एका पुस्तकविक्रेत्यांनी इथे ओळीनं दहा स्टॉल्सवर पुस्तकं मांडली आहेत आणि ‘इथला प्रतिसाद मुंबईपेक्षा अधिक’ हीच भावना तिथं काम करणाऱ्यांची आहे.
शास्त्रीय नृत्य, लोकनृत्यं, रॉक आणि जनप्रिय संगीत, वाद्यवादन आणि शास्त्रीय गायन अशा निरनिराळ्या प्रकारांत काही तरी करून दाखवू पाहणाऱ्या नवोदितांचे कार्यक्रम, सहा खास मंचांवर अक्षरश: दिवसभर इथं चालू आहेत. सकाळी साडेसहाला रूपकुमार राठोड यांचा सुफी संगीताचा कार्यक्रम शनिवारी झाला, तिथंही ठाणेकर उत्साहानं हजर होते.
‘काळा घोडा उत्सवाला आम्ही एखाद फेरी मारतो,’ असं आजवर अनेक जण सांगत. त्या तुलनेत उपवन फेस्टिव्हल कसा वाटतो, असं विचारलं असता ‘इथं ठाण्याच्या उत्सवात अर्धा दिवस सहज मजेत जातो आहे आणि संध्याकाळी पुन्हा यावंसं वाटतंय’ अशी भावना अनेकांनी बोलून दाखवली. या अनेकांमध्ये त्रिकोणी कुटुंबं होती, विद्यार्थी होते, कलावंत तर होतेच, पण स्टॉलधारकही होते.
रविवारी, १२ जानेवारी रोजी संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या उपवन आर्ट फेस्टिव्हलबद्दल हे समाधान असताना अनेकांना चिंता आहे ती, पुढल्या वर्षी यापेक्षा मोठय़ा स्वरूपात हा उपक्रम होणार ना, याचीच. बिल्डरांनी या उत्सवासाठी पैसा ओतला आहे, असं म्हटलं जातं. ती माया आटणार तर नाही ना, अशी शंका काही जणांना आहे.
ठाण्याच्या विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी शहराचे, जिल्ह्य़ाचे आणि आपापली शाळा ते घर या रस्त्याचे नकाशे चित्रासारखे काढले आहेत. अशा हजाराहून अधिक नकाशांचं खुलं प्रदर्शन मांडण्यात ठाणे स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. मुलं नकाशे काढतात तेव्हा भूगोलाचं पुस्तक आणि गुगल मॅप्स यापेक्षा केवढी तरी अधिक कल्पनाशक्ती लढवतात, हे पाहण्यासाठी इथं आवर्जून जावं.
काळा घोडय़ाला ठाण्याचा लगाम
उस्ताद झाकीर हुसेन यांच्या तबल्याच्या तालानिशी शुक्रवारपासून सुरू झालेला उपवन कलाउत्सव अपेक्षेहून अधिक यशस्वी होणार असल्याची चिन्हे दुसऱ्याच
First published on: 12-01-2014 at 01:06 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Upvan arts festival bridle to black horse