प्रसिद्ध अभिनेत्री उर्फी जावेद हिला आज (३ नोव्हेंबर) मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आल्याचे वृत्त समाज माध्यमांवर पसरले होते. अनेक समाज माध्यमांवरील खात्यावरून संबंधित व्हिडीओही व्हायरल झाला होता. त्यामुळे उर्फीला तिच्या तोकड्या कपड्यांवरून खरंच अटक करण्यात आलं असेल अशी चर्चा रंगली होती. मात्र, आता यासंदर्भात मुंबई पोलिसांनी खुलासा केला आहे. तसंच, व्हिडीओद्वारे खोटी माहिती पसरवल्याप्रकरणी एका तोतया निरीक्षकालाही अटक करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
तोकडे कपडे घातल्याप्रकरणी उर्फी जावेदला अटक करण्यात आल्याचं वृत्त सोशल मीडियावर पसरलं. उर्फी जावेदच्या अटकेचा हा व्हिडीओ पापाराझी अकाउंट विरल भयानी व सेलिब्रिटी फोटोग्राफर वरिंदर चावला यांनी शेअर केला. कालांतराने विरल भयानीने हा व्हिडीओ हटवला आहे. व्हिडिओमध्ये उर्फी जावेद एका कॅफेमधून बाहेर पडताना दिसत आहे, जिथे दोन महिला पोलीस येतात आणि तिला सोबत चल असं म्हणतात.
त्यावर उर्फी जावेद पोलिसांना त्यामागचं कारण विचारते. उत्तर देताना महिला पोलीस तिच्या तोकड्या व अतरंगी कपड्यांचा उल्लेख करतात. मग उर्फी म्हणते की ती तिला हवे तसे कपडे घालू शकते, पण पोलीस नकार देत तिला गाडीत बसवून नेतात. दरम्यान, हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला.
परंतु, हा व्हिडीओ बनावट असल्याचं समोर आलं आहे. मुंबई पोलिसांनी याबाबत X वर पोस्ट केली आहे. मुंबई पोलीस म्हणतात की, स्वस्त प्रसिद्धीसाठी, कोणीही कायद्याचं उल्लंघन करू शकत नाही.
“मुंबई पोलिसांनी एका महिलेला अश्लीलतेच्या प्रकरणात अटक केल्याचा व्हायरल व्हिडिओ खरा नाही. सन्मानचिन्ह आणि गणवेशाचा गैरवापर करण्यात आला आहे”, असंही पोलिसांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
“दिशाभूल करणार्या व्हिडिओमध्ये सामील असलेल्यांविरूद्ध, ओशिवरा पोलीस ठाण्यात कलम १७१, ४१९, ५००, ३४ भा.दं.वि. अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असताना, तोतया निरीक्षक अटकेत आहे आणि वाहनही जप्त करण्यात आले आहे”, अशीही माहिती मुंबई पोलिसांनी दिली. परंतु, मुंबई पोलिसांनी या पोस्टमध्ये उर्फी जावेदचा स्पष्ट उल्लेख केलेला नाही.
दरम्यान, टाईम्स ऑफ इंडियाला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्फी जावेदने व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या महिलांना एक हजार रुपयांच्या मानधनावर पोलिसांची भूमिका साकारायला दिली होती. या महिलाही बॉलिवूडशी संबंधित आहेत. तसंच, एका प्रोडक्शन मॅनेजरला तिने तीन हजार रुपये दिले. या प्रोडक्शन मॅनेजरने तिघांना या व्हिडीओमध्ये काम करण्यास सांगितले होते. तसंच, “मी दुबईत आहे” असा मेसेज करून उर्फी जावेदने मोबाईल स्वीच ऑफ केला आहे. व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या लोकांना पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. तर अटक करण्यात आलेल्या तोतया पोलीस निरिक्षकाचं नाव गणपत असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली.