मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने भारतीय मुली आळशी असल्याचं वक्तव्य केलं होतं. तिच्या या विधानानंतर तिच्यावर खूप टीका झाली. अनेकांनी तिला महिलांचा अपमान करत असल्याचं म्हणत फटकारलं. काहींनी मात्र तिचं समर्थनही केलं. अशातच सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर उर्फी जावेदने सोनाली कुलकर्णीच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
“तू जे काही बोललीस ते किती असंवेदनशील होतं. आधुनिक काळातील महिला त्यांची नोकरी व घरातील कामं दोन्ही सांभाळतात, त्यांना तू आळखी म्हणतेस? चांगले पैसे कमावणारा नवरा हवा, अशी मुलींची इच्छा असेल तर त्यात गैर काय? शतकानुशतके पुरुषांनी स्त्रियांना फक्त मुलं जन्माला घालण्याचं मशीन म्हणून पाहिलं. लग्नात मुलीच्या कुटुंबाकडून हुंडाही मागितला जातो. त्यामुळे महिलांनो, तुमच्या अटी व मागण्या मांडण्यास घाबरू नका. होय, महिलांनी काम केले पाहिजे, हे तुझं म्हणणं बरोबर आहे, परंतु हा एक विशेषाधिकार आहे जो प्रत्येकाला मिळत नाही,” असं उर्फीने सोनालीचा व्हिडीओ रिट्वीट करत म्हटलं आहे.
दरम्यान, उर्फीच्या या ट्वीटवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांना उर्फीचं म्हणणं योग्य वाटत आहे. या देशातील महिला कुटुंब सांभाळण्यासाठी प्रचंड मेहनत करतात, त्यामुळे सोनालीने असं सरसकट सगळ्याच महिला व मुलींना आळशी म्हणणं चुकीच आहे, अशा प्रकारच्या कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.