मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद गेल्या काही दिवसांपासून एक वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ व उर्फीमधील वाद संपायचं काही नाव घेत नाही. “असा नांगनाच आम्ही महाराष्ट्रात चालू देणार नाही.” असं म्हणत चित्रा वाघ यांनी उर्फीवर टिका केली. चित्रा वाघ यांनी पोलिसांत उर्फीविरोधात तक्रारही दाखल केली होती. शिवाय उर्फीनेही चित्रा वाघ यांना उत्तर दिलं होतं. आता या वादामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांनी आपलं मत मांडलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – “…पण माझा नंगानाच सुरूच राहील”, उर्फी जावेदचा चित्रा वाघ यांना टोला

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

एका कार्यक्रमानिमित्त पत्रकारांशी बोलत असताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मला अशावेळी कै. अरुण जेठलीजी आठवतात. ते म्हणायचे, तुम्ही दाखवणं बंद करा लोकं बोलणं बंद करतील. माझी सगळ्याच पक्षांना अगदी राष्ट्रावादीला, महाविकास आघाडीलाही माझी नम्र विनंती आहे की, आपल्या गलिच्छ राजकारणासाठी कुठल्याही विषयावर महिलेला जी कोणाची तरी बहिण, आई, मुलगी, मैत्रीण आहे तिला बोलू नये.”

“हे माझं वैयक्तिक मत आहे. सुसंस्कृत आपलं राज्य आहे. आपल्या राज्याला खूप मोठी सामाजिक बांधिलकी आहे. बऱ्याचदा मोठे सामाजिक परिवर्तन होतात त्याची सुरुवात महाराष्ट्रातून झालेली आहे. सावित्रीबाई फुले यांच्या कामाची सुरुवातही महाराष्ट्रातूनच झाली. जिजाऊंबाबत आपण अभिमानाने बोलतो त्याही महाराष्ट्रातीलच आहेत.”

आणखी वाचा – “माझा नंगानाच सुरुच राहणार” म्हणणाऱ्या उर्फी जावेदला चित्रा वाघ यांचा इशारा; म्हणाल्या, “तिला…”

पुढे त्या म्हणाल्या, “समाजामध्ये आपणच सगळ्यांनी थोडसं स्वतःला आवरलं पाहिजे. मी स्वतः पहिल्या दिवसापासून असे मला कोणतेही प्रश्न विचारले तर मी म्हणते, यावर माझं कोणतंही मत नाही. हे माझं राजकारण नाही. मी याच्यासाठी निवडून आलेली नाही. तुमच्या आयुष्यात चांगला बदल घडवण्यासाठी मी निवडून आलेले आहे.” उर्फी जावेद व चित्रा वाघ हा वाद आणखीन किती रंगणार हे पाहावं लागेल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Urfi javed chitra wagh controversy see supriya sule reaction kmd