सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदच्या कपड्यांवर आक्षेप घेत भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी पोलिसांत तक्रार केली होती. उर्फीवर कारवाई करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे केली होती. याप्रकरणी चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत महिला आयोगाला टोला लगावला आहे.
चित्रा वाघ यांनी महिला आयोगाने अभिनेत्री तेजस्विनी पंडितला पाठवलेल्या नोटिसीचाही उल्लेख केला. “महिला आयोगाने मराठी मुलगी, महाराष्ट्राची लेक तेजस्विनी पंडितला नोटीस पाठवली होती. अनुराधा या तिच्या वेब सीरिजच्या पोस्टवरील अंगप्रदर्शनाने समाज मनावर विपरीत परिणाम होत होता, असं त्यांचं म्हणणं होतं. पण उर्फीच्या नंगानाचमुळे समाज मनावर परिणाम होत नाही, असं ते म्हणत आहेत”, असं चित्रा वाघ म्हणाल्या.
“उर्फीबाबत बोलायला तिची दखल घ्यायला महिला आयोगाला वेळ नाही. पण तेजस्विनी पंडितला नोटीस पाठवलेली आहे”, असंही पुढे चित्रा वाघ म्हणाल्या. “आयोगाचं काम महिलांचा सन्मान जपणं, मान राखणं आहे. मग, उघड्या, नागड्या फिरणाऱ्यांना आयोगाला जाब विचारु वाटला नाही. एखादी महिला मुंबईत उघडी-नागडी फिरत आहे. समाजमाध्यमांत अश्लील, घाणेरडे व्हिडीओ व्हायरल होत असताना सुमोटो दाखल करुन कारवाई का केली नाहीत. यासाठी महिला आयोगाला वेळ नसेल तर, मग त्या पदावर बसण्याचा कोणाला अधिकार नाही,” असा घणाघात चित्रा वाघ यांनी केला आहे.
हेही वाचा>> “पात्रता नसलेले स्पर्धक अजूनही…”, घरातून बाहेर पडताच आरोह वेलणकरचे ‘बिग बॉस’वर गंभीर आरोप
“मुंबईतल्या भर रस्त्यात उर्फीच्या या शरीरप्रदर्शनाचं जे अतिशय बिभत्स आहे. महिला आयोग समर्थन करतंय का?”, असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला होता. यावर उत्तर देत “प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य आहे. त्यामुळे कोणी काय कपडे घालावेत हे ज्याचं त्यानं ठरवायला हवं. तेव्हा कपडे परिधान करण्याचं स्वातंत्र्य द्यायला हवं. एखादा पेहराव ठराविक व्यक्तींना अश्लील वाटत असेल, पण इतरांना तो अश्लील वाटत नसतो. त्यामुळं आयोग अशा बाबतीत वेळ वाया घालवू शकत नाही,” असं महिला आयोगाच्य अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या होत्या.