अशनीर ग्रोव्हर आणि त्याने सुरू केलेली फीनटेक कंपनी BharatPe यांच्यात सुरू असलेला कायदेशीर वाद दोन्ही बाजूंनी सुटलेला दिसत नाही. आता या प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने फसवणुकीच्या आरोपाखाली अशनीर ग्रोव्हर आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध नवीन गुन्हा दाखल केला आहे. ‘भारतपे’च्या तक्रारीच्या आधारे एफआयआर दाखल करण्यात आलेली आहे.
१० मे रोजी, EOW(Economic Offences Wing) ने भारतपेचे माजी व्यवस्थापकीय संचालक अशनीर ग्रोव्हर, त्याची पत्नी माधुरी जैन ग्रोव्हर आणि दीपक गुप्ता, सुरेश जैन आणि श्वेतांक जैन यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील काही सदस्यांविरुद्ध ८१ कोटींच्या फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. यामुळे अशनीर पुन्हा चर्चेत आला आहे. अशनीरच्या या घोटाळ्यावर मॉडेल आणि अभिनेत्री उर्फी जावेद हिनेदेखील ताशेरे ओढले आहेत.
आणखी वाचा : बांगलादेशच्या बॉक्स ऑफिसवरही ‘पठाण’चा डंका; पहिल्या दोन दिवसाचं बुकिंग फूल
उर्फीच्या फॅशनबद्दल टिप्पणी करतानाचा एक व्हिडिओ क्लिप उर्फीने शेअर केली असून अशनीरचं मूळ काम (कोर काम) काय आहे याबद्दल उर्फीने वक्तव्य केलं आहे. अशनीरचा हा व्हिडिओ स्टोरीवर शेअर केल्यानंतर लगेचच उर्फीने पुढील पोस्टमध्ये अशनीरच्या ८१ कोटींच्या घोटाळ्याची बातमी शेअर केली आहे. ही बातमी शेअर करताना उर्फीने लिहिलं की, “यांचं कोर (मूळ काम) हेच करोडोंची फसवणूक करायचे आहे, म्हणूनच ही मंडळी सेलिब्रिटी आहेत.”
या पोस्टमधून अशनीर ग्रोव्हरने उर्फीबद्दल केलेल्या वक्तव्यावर उत्तर दिलं आहे. हे प्रकरण गेल्या वर्षभरापासून सुरू आहे, यापूर्वी अशनीर ग्रोव्हरने कोटक बँकेच्या कर्मचार्यांशी केलेल्या गैरवर्तनाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यानंतर फेब्रुवारी २०२२ मध्ये माधुरी जैन यांना फसवणुकीच्या आरोपावरून कंपनीतून काढून टाकण्यात आले. अशनीरच्या पत्नीने कंपनीच्या निधीतील पैसे खासगी गोष्टींसाठी खर्च केल्याचा आरोपही कंपनीने केला होता.