आपल्या फॅशन सेन्समुळे उर्फी जावेद सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. याशिवाय आपल्या वक्तव्यांमुळेही ती सोशल मीडियावर चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच तिनं आपण इस्लाम मानत नसल्याचं म्हणत सर्वांना चकीत केलं होतं. अर्थात यानंतर तिला बरंच ट्रोलही करण्यात आलं होतं. मुस्लीम कट्टरपंथीयांनी तिच्यावर टीकाही केली होती. त्यावर आता उर्फीनं यावर मौन सोडत टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं आहे. तिने या लोकांना कुराण वाचण्याचाही सल्ला दिला आहे. तसेच मुस्लीम पुरुषांनाआपला दृष्टीकोन बदलण्याची गरज असल्याचंही तिने म्हटलंय. उर्फी जावेदचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये उर्फी म्हणते, ‘जे माझ्या फोटोंवर सातत्यानं कमेंट करून मी इस्लामच्या नावावर डाग आहे, माझ्या विरोधात फतवा काढायला हवा, माझे कपडे असे नाहीत तसे नाहीत असं म्हणतात. त्या सर्व मुस्लीम कट्टरपंथीयांना मी सांगू इच्छिते की, कुराणमध्ये हे कुठेही लिहिलेलं नाही की एका स्त्रीला तुम्ही जबरदस्ती करून बुरखा घालायला लावा किंवा अंगभर कपडे घालायला लावा. हे नक्कीच लिहिलं आहे की स्त्रीने पूर्ण कपडे घालायला हवे. पण जर ती असं करत नसेल तर तिला शिवीगाळ करा, तिला जबरदस्ती करून पूर्ण कपडे घालायला लावा असा त्याचा अर्थ होत नाही. तुम्ही जाऊन पुन्हा एकदा कुराण वाचायला हवं. कारण त्यात हे लिहिलं आहे की, पुरुषांनी महिलांकडे चांगल्या नजरेनं पाहावं, त्यांनी महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलण्याची गरज आहे.’
या व्हिडीओमध्ये उर्फीनं सोशल मीडियावर मुलींचे फोटो पाहण्याला हराम म्हटलं आहे. ती म्हणाली, ‘एक पुरुष लग्नाआधी मुलींना चुकीच्या नजरेनं पाहू शकत नाही. त्यामुळे जे लोक इन्स्टाग्रामवर मुलींचे फोटो पाहतात. त्यांच्या फोटोंवर चुकीच्या कमेंट करतात. हे सर्व चुकीचं आहे. तुम्ही असं करू शकत नाही. तुम्ही अशा महिलांचे किंवा मुलींचे फोटो पाहू शकत नाही. खासकरून तेव्हा जेव्हा तिने पूर्ण कपडे घातलेले नाही. हे तुम्ही खूप चुकीचं करत आहात. इस्लामचे जे नियम आहेत ते दीड हजार वर्षांपूर्वी तयार करण्यात आले होते. त्यावेळी महिलांकडे कोणतेही अधिकार नव्हते.’
याशिवाय उर्फीनं या व्हिडीओमध्ये इस्लामधील चार लग्नांची पद्धती तसेच लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवणे अशा विषयांवरही भाष्य केलं आहे. ‘लग्नाआधी शरीर संबंध ठेवणं इस्लामच्या नियमांनुसार चुकीचं आहे तरीही लोक ते करतात’ असंही उर्फीनं म्हटलं आहे. ‘स्त्रियांना चुकीच्या नजरेतून किंवा चुकीच्या दृष्टीकोनातून पाहणं जेव्हा बंद कराल तेव्हाच तुम्ही खरे मुस्लीम होऊ शकाल’ असं उर्फीनं तिच्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.