९०च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने बॉलिवूडला पाठ फिरवत राजकारणात प्रवेश घेतला असला तरी आजही उर्मिलाचे अनेक गाजलेले सिनेमा आणि गाणी चाहते विसरू शकलेले नाही. उर्मिलाच्या लोकप्रिय ठरलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे ‘रंगीला’. हा सिनेमा चांगलाच सुपरहिट ठरला होता. तसचं या सिनेमातील गाणीदेखील लोकप्रिय ठरली होती. नुकतीच उर्मिलाने या सिनेमातील ‘तनहा तनहा’ या गाण्याबद्दल एक खास गोष्ट शेअर केलीय.
‘रंगीला’ सिनेमातील ‘तनहा तनहा’ गाण्यात उर्मिलाचा बोल्ड लूक पाहायला मिळला. या गाण्यात उर्मिला समुद्रावर डान्स करताना दिसतेय. या गाण्यात एके ठिकाणी तिने पांढऱ्या रंगाचा एक शॉर्ट ड्रेस परिधान केलाय. मात्र प्रत्यक्षात हा ड्रेस नसून उर्मिलाने या गाण्यावेळी जॅकी श्रॉफची पांढरी बनियान परिधान केली होती. उर्मिलाने स्वत:या गोष्टीचा खुलासा केलाय. नुकतीच उर्मिलाने ‘झी कॉमेडी शो’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी ती म्हणाली, “कुणाला माहित नाही मात्र रंगीला सिनेमातील ‘तनहा तनहा’ गाण्यासाठी मी जॅकी श्रॉफची गंजी घातली होती आणि हे खूपच मजेशीर होतं. आम्हाला सांगितलं होतं काही तरी नॅचरल वाटेल असा विचार करा. जेव्हा आम्ही कपड्यांबद्दल चर्चा करत होतो तेव्हा जॅकी मला म्हणाला की तू माझी बनियान घाल. कसं दिसेल मला खात्री नव्हती. मी सर्व देवावर सोडलं. मात्र यासाठी माझं नंतर कौतुक झालं.” असं तिने सांगितलं.
क्यूट फोटो शेअर करत रसिका सुनीलने चाहत्यांना दिली आनंदाची बातमी; लवकरच अडकणार लग्नबंधनात
पायाला दुखापत झाली असतानाही बिग बी करत आहेत ‘कौन बनेगा करोडपती’ शोचं शूटिंग, शेअर केले फोटो
तर एका मुलाखतीत या सिनेमाचे दिग्दर्शक राम गोपल वर्मा यांनी देखील या ड्रेसचं श्रेय जॅकी श्रॉफला दिलं होतं. सुरुवातील राम गोपाल वर्मा यांनी या गाण्यासाठी ठरवण्यात आलेल्या कपड्यांना नकार दिला होता. त्यांनी जॅकी श्रॉफच्या टीशर्टकडे बोट दाखवत उर्मिलासाठी असं काही तरी हवं असल्याची कल्पना मांडली होती. यावर जॅकीने त्याचं बनियान काढलं आणि तो म्हणाला, “भिडू ये पहन लो”. त्यामुळे या ड्रेसचं श्रेय जॅकीला असल्याचं राम गोपाल वर्मा म्हणाले होते.
‘रंगीला’ सिनेमात उर्मिलासोबत आमिर खान आणि जॅकी श्रॉफ मुख्य भूमिकेत झळकले होते. या सिनेमामुळे उर्मिलाला मोठी लोकप्रियता मिळाली होती.