दखल
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com, @chaijoshi11

‘धग’ या चित्रपटापासून सुरु झालेला तिचा प्रवास तिला थेट स्पेनपर्यंत घेऊन गेला. राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित उषा जाधव ही अभिनेत्री आता तिच्या अभिनयाची चुणूक दाखवायला स्पेनमध्ये पोहोचली आहे.

साधारण सहा वर्षांपूर्वी मराठी सिनेसृष्टीत एक चेहरा बराच नावाजला गेला. त्या चेहऱ्याची ओळख अभिनयाच्या खणखणीत नाण्यामुळे सर्वत्र पसरली. मिळालेली भूमिका समजून-उमजून केलेल्या या चेहऱ्याने थेट राष्ट्रीय पुरस्कारावर आपलं नाव कोरलं. हा चेहरा होता उषा जाधव या अभिनेत्रीचा. ‘धग’ या मराठी सिनेमासाठी तिला सवरेत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि तिच्या यशाचा मार्ग सुरू झाला. त्यानंतर तिने ‘भूतनाथ रिटर्न्‍स’ आणि ‘वीरप्पन’ या सिनेमांमध्ये काम केलं. पण त्यानंतर ती फारशी दिसली नाही. ‘उषा जाधव सध्या काय करते, कुठे असते’ हे प्रश्न सिनेवर्तुळात आणि तिच्या चाहत्यांमध्ये उमटत होते. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ती स्पेन, ऑस्ट्रेलिया अशा देशांमध्ये आहे हे कळत असलं तरी तिथे ती नेमकं काय करते हा प्रश्न होताच. ‘लोकप्रभा’ने  तिच्याशी याबाबत गप्पा मारल्या.

सध्या स्पेनमध्ये असलेली उषा तिच्या स्पेनपर्यंत पोहोचण्याच्या प्रवासाबद्दल सांगते, ‘मी साधारण दोनेक वर्षांपूर्वी एका फोटोशूटच्या निमित्ताने स्पेनमध्ये आले होते. स्पेनमध्ये सारागोसा या ठिकाणी अल्खाफारिया पॅलेस आणि तोरे दि लाग्वा या जागी फोटोशूट झालं. आलेहॉनडरो कोर्टेस, वेनेसा अलामी आणि नाचो ग्रासिया यांनी फोटोशूट केलं. या फोटोशूटच्या दरम्यान माझ्या तिथे वाढत असलेल्या ओळखींमधूनच मला तिथल्या फिल्म फेस्टिव्हल्सची आमंत्रणे मिळू लागली. आलेहॉनडरो हे फोटोग्राफर तर आहेतच पण दिग्दर्शकही आहेत. त्यांनीच मला एका स्पॅनिश सिनेमासाठी विचारलं. त्यांनी माझे ‘धग’, ‘वीरप्पन’, ‘भूतनाथ रिटर्न्‍स’ हे सिनेमे पाहिले होते. तसंच काही अ‍ॅड फिल्म्सही पाहिल्या होत्या. त्यांच्या सिनेमासाठी मी होकार दिला. तसंच मला त्यामध्ये स्पॅनिश भाषा बोलावी लागणार होती. माझ्यासाठी हे सगळंच आव्हान होतं.’ परदेशात जाऊन फोटोशूट करण्याचं निमित्त ठरलं आणि उषाला थेट स्पॅनिश सिनेमात काम करण्याची संधी मिळाली. या स्पॅनिश सिनेमासह वेन्तुरा पोन्स दिग्दर्शित आगामी ‘शेक इट बेबी’ या सिनेमातही ती झळकणार आहे.

कलाकार त्याच्या भूमिकांवर नेहमीच मेहनत घेत असतो. कधी ती मेहनत शारीरिक असते, कधी मानसिक तर कधी बौद्धिक. उषानेदेखील या सिनेमासाठी स्पॅनिश भाषेचे धडे गिरवायला सुरुवात केली. विशेष म्हणजे फक्त भाषेवरच नाही तर तिने तिथल्या वातावरणाशीदेखील समरसून घ्यायचं ठरवलं. ‘स्पॅनिश भाषा तर शिकायचीच होती. पण केवळ भाषा शिकून उपयोगाचं नव्हतं हे माझ्या लक्षात आलं. तिथलं वातावरणही समजून घ्यायला हवं म्हणूनच मी तिथलं वातावरण, संस्कृती, राहणीमान, व्यवहार असं सगळंच आत्मसात करायला हवं. यासाठी मी स्पेन गाठलं. गेल्या दोनेक वर्षांपासून मी भारत-स्पेन-भारत असा प्रवास करत आहे. मला हा प्रवास आणि शिकण्याची प्रक्रिया असं दोन्ही आवडतंय’, उषा सांगते. उषा स्पॅनिश भाषा कोणत्याही शास्त्रोक्त पद्धतीने शिकत नसून तिथल्या लोकांमध्ये राहून, व्यवहार करताना मिळणाऱ्या अनुभवातून शिकतेय. ज्येष्ठ दिग्दर्शक अरुण राजे यांच्या एका आगामी सिनेमात उषा काम करत असून त्यासाठी ती नुकतीच भारतात येऊन गेली.

कोल्हापूरहून पुणे, पुण्याहून मुंबई आणि आता मुंबईहून स्पेन; उषाचा हा प्रवास अतिशय रंजक आहे. अभिनयात करिअर करायचं स्वप्न उराशी घेऊन संघर्ष करत ती जिद्दीने पुढे आली. राष्ट्रीय पुरस्कार मिळण्याआधीपासून ती शॉर्ट फिल्म, जाहिराती, कार्यक्रमांचे प्रोमो, हिंदी सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम करत होतीच; पण राष्ट्रीय पुरस्कारामुळे खऱ्या अर्थाने ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचली. तिच्या या प्रवासाबद्दल ती सांगते, ‘‘कोल्हापूर ते स्पेन हा प्रवास मलाही आश्चर्यकारक वाटतो. माझ्या करिअरचा प्रवास इतका रंजक असेल कधी वाटलं नव्हतं. मी माझ्या स्वप्नाच्या दिशेने एकेक पाऊल पुढे जात राहिले आणि आज स्पेनमध्ये येऊन पोहोचले आहे. युरोपिअन फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करेन असं कधीच वाटलं नव्हतं.’’ राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर कलाकारामध्ये त्याच्या भूमिका निवडीमध्ये बदल होताना अनेकदा दिसतो. तसंच त्याच्या अभिनयातील प्रगल्भताही जाणवते. असाच बदल उषाच्या कारकीर्दीत दिसून आला. स्पेनला जाण्यामागचा विचार नेमका काय होता ती सांगते, ‘धग या सिनेमातल्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर मी स्वत:लाच एक प्रश्न विचारला की, हा पुरस्कार मिळाल्यानंतरही आपण आधी जे करायचो तेच करायचं आहे का? तर ‘नाही’ असं उत्तर मिळालं. आता याहीपेक्षा पुढे जायला हवं. काही तरी वेगळं करायला हवं, शिकायला हवं, असं सतत डोक्यात होतं. त्यानंतर स्पेनमधलं फोटोशूटचं निमित्त ठरलं आणि मी तिथल्या सिनेमांच्या जवळ जाऊ लागले. माझ्यासाठी हा मी ठरवलेल्या ध्येयाच्या दिशेने केलेला एक प्रयत्न होता, प्रयोग होता.’’ मधल्या काळात उषाने मोठय़ा बॅनरच्या मराठी-हिंदी सिनेमांनादेखील नकार दिल्याचं ती प्रामाणिकपणे कबूल करते. सध्या स्पेनमध्ये होत असलेल्या सिनेमांवरच लक्ष केंद्रित करायचे असल्यामुळे तिने हा निर्णय घेतल्याचं ती सांगते. मराठी-हिंदी सिनेमे करायचेच नाहीत असं अजिबातच नाही.

एखाद्या कलाकाराचा पहिला सिनेमा आणि दहावा सिनेमा यात बराच फरक असतो. कलाकार म्हणून तो त्या-त्या व्यक्तिरेखांमुळे प्रगल्भ होत असतो. जसं त्याच्या अभिनयात तो प्रगल्भ होतो तसंच त्याचं व्यक्तिमत्त्वही प्रगल्भ होत जातं, तो कलाकार चांगल्या प्रकारे विकसित होत असतो. उषाचंही असंच झाल्याचं दिसून येतंय. तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून तिचे फोटो, तिच्या पोस्टमधून मांडलेली मतं, विचार, तिची वेबसाइट या सगळ्या गोष्टी तिच्या या वाढीच्या साक्षीदार आहेत. ‘‘गेल्या काही वर्षांत मी खूप ग्रूम झाले. खरं तर होत गेले. आपण ज्या वातावरणात राहतो त्यानुसार बदललं पाहिजे, तिथलं राहणीमान स्वीकारलं पाहिजे. गेल्या दोनेक वर्षांत मी सतत प्रवास करतेय. या प्रवासातूनही बरंच शिकायला मिळतं. नवीन गोष्टी समजतात, माहिती मिळते, नवीन माणसं भेटतात, नवी भाषा उमगते, दृष्टिकोन बदलतो, विचार करण्याची पद्धत बदलते, मतं मांडायची नवी पद्धत गवसते. या सगळ्यामुळे व्यक्तिमत्त्वही विकसित होत जातं. माझंही तसंच झालं. प्रवास आणि बदलाला स्वीकारण्याची वृत्ती असल्यामुळे मीदेखील विकसित होत गेले.’’ उषा तिच्या व्यक्तिमत्त्वात झालेल्या बदलाबद्दल सांगत होती.

व्यक्तिमत्त्वातील बदलासह तिने स्वत:मध्ये व्यावसायिकदृष्टय़ाही बदल केले आहेत. कलाकाराचा मॅनेजर, पीआर (पब्लिक रिलेशन) असणं, वेबसाइट असणं हे सगळे घटक व्यावसायिकदृष्टय़ा महत्त्वाचे असतात. सर्वसामान्यांना ते कलाकारांपर्यंत पोहोचण्याचे अडथळे वाटतात; पण कलाकारांसाठी ते अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. उषा याबाबत सांगते, ‘‘मॅनेजर, पीआर, वेबसाइट असणं हे आम्हा कलाकारांसाठी व्यावसायिकदृष्टय़ा आवश्यक असतं. ती आजची गरज आहे. फिल्म इंडस्ट्री याच पद्धतीने सुरू आहे. यात मला काहीच गैर वाटत नाही. तसंच वेबसाइटही गरजेची आहे. कोणत्याही दिग्दर्शक, निर्मात्याला भेटताना तुमची सगळी माहिती तोंडी न देता व्यावसायिक पद्धतीने त्यांच्यासमोर ठेवली तर त्याचा वेगळा प्रभाव पडतो. स्पेनमध्ये आशियाई लोकसंख्या कमी आहे. त्यामुळे तिथल्या लोकांना भारतीय सिनेमा आणि कलाकार यांच्याबद्दल फार माहिती नाही. त्यामुळे मी तिथल्या दिग्दर्शकांना भेटायला जाताना माझी माहिती व्यावसायिक पद्धतीने पुढे केली तर माझ्यासाठी ते चांगलंच आहे.’’

कोल्हापूरहून सुरू झालेला उषाचा प्रवास रंजक पद्धतीने स्पेनपर्यंत येऊन पोहोचला आहे. ‘ट्रॅफिक सिग्नल’, ‘धग’, ‘भूतनाथ रिटर्न्‍स’, ‘स्ट्रायकर’, ‘वीरप्पन’, ‘लाखों में एक’ अशा अनेक सिनेमा, मालिका, प्रोमो, जाहिरातींमधून दिसलेली उषा आता आंतरराष्ट्रीय सिनेमांमध्ये झळकणार आहे. तिच्या अभिनयाची चुणूक तिथेही दिसून येईल यात शंका नाही.
सौजन्य – लोकप्रभा