‘भूतनाथ’ हा २००८ साली आलेला विवेक मिश्रा दिग्दर्शित चित्रपट लोकप्रिय ठरला होता. सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची मुख्य भूमिका असलेल्या चित्रपटाचा सिक्वल ‘भूतनाथ रिटर्न्स’ या नावाने येतो आहे. या चित्रपटात ‘भूतनाथ’ म्हणजेच अमिताभ यांच्याबरोबर पुन्हा काम करण्याची संधी राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री उषा जाधव हिला मिळाली आहे. उषाने यापूर्वी केबीसीच्या जाहिरातीत अमिताभ यांच्याबरोबर काम केले होते. मुलींचे महत्त्व पटवून देणाऱ्या या जाहिरातीमुळे उषाचा चेहरा घरोघरी ओळखीचा झाला होता. ‘भूतनाथ रिटर्न्स’मुळे अमिताभबरोबर पूर्ण लांबीचा चित्रपट करायला मिळाल्याबद्दल आनंद झाल्याचे उषाने ‘वृत्तान्त’शी बोलताना सांगितले.
‘भूतनाथ’मध्ये जुही चावला मुख्य भूमिकेत होती. मात्र सिक्वलमध्ये ‘भूतनाथ’वगळता बाकी सर्व व्यक्तिरेखा नवीन असणार आहेत. संपूर्ण कथा नवीन असल्याने जुहीच्या भूमिकेसाठी उषाची निवड झालेली नाही. मूळ चित्रपटात बंकू या छोटय़ा मुलाभोवती भूतनाथची कथा गुंफण्यात आली होती. सिक्वलमध्ये पार्थ या मुलाचा प्रवेश झाला असून उषा या चित्रपटात पार्थच्या विधवा आईची भूमिका करते आहे.
‘भूतनाथ रिटर्न्स’मध्ये अमिताभबरोबर जास्त वेळ काम करण्याची संधी मिळणार याची उत्सुकता होतीच. शिवाय चांगली पटकथा, भूमिका आणि मोठा बॅनर या सगळ्याच जमेच्या गोष्टी असल्यामुळे मला चित्रपट करावासा वाटला, असे उषाने सांगितले. याआधी मी अमिताभ यांच्याबरोबर केबीसीच्या जाहिरातीत काम केले, तेव्हा फारच कमी वेळ मला मिळाला होता. आता मात्र या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांच्याबरोबर काम केल्यानंतर आपण एक अभिनेत्री आहोत याचे फार सार्थक झाल्यासारखे वाटले, असे तिने सांगितले.
‘भूतनाथ रिटर्न्स’चे जवळजवळ ८० टक्के चित्रीकरण पूर्ण झाल्याचे तिने सांगितले. ‘धग’साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर इंडस्ट्रीत आपल्याला मिळत असलेली वागणूक आणि एकूणच अभिनेत्री म्हणून आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन यात बराच बदल झाला असल्याचे ती कबूल करते. ‘भूतनाथ रिटर्न्स’सारख्या मोठय़ा बॅनरच्या हिंदी चित्रपटामुळे आपल्या कारकिर्दीला चांगलाच फरक पडणार आहे. पण तरीही यापुढे आपण हिंदीबरोबरच मराठीही चित्रपट करणार आहोत. मात्र पटकथा आणि भूमिका सशक्त असायला हव्यात एवढीच आपली अट असल्याचे तिने सांगितले. सिक्वलचे दिग्दर्शन ‘चिल्लर पार्टी’ चित्रपटाचा दिग्दर्शक नितेश तिवारी करतो आहे. यात उषाबरोबर बोमन इराणी यांचीही मुख्य भूमिका असून रणबीर कपूर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.
‘भूतनाथ रिटर्न्स’मध्ये अमिताभबरोबर उषा जाधव
‘भूतनाथ’ हा २००८ साली आलेला विवेक मिश्रा दिग्दर्शित चित्रपट लोकप्रिय ठरला होता.
First published on: 28-01-2014 at 11:06 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Usha jadhav with amitabh bachchan in bhoothnath returns