सध्या संपूर्ण महाराष्ट्रात वारीमुळे भक्तीमय वातावरण आहे. करोना, लॉकडाऊन यामुळे तब्बल दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा भक्तांची पंढरपूर वारी यंदा पुन्हा तेवढ्याच उत्साहात सुरू झाली आहे. यंदाच्या वारीमध्ये सामान्य जनतेसोबतच अनेक मराठी सेलिब्रेटी देखील सहभागी होताना दिसत आहे. तर काही सेलिब्रेटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून वारीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. नुकतंच प्रसिद्ध गायक उत्कर्ष शिंदेनं देखील यानिमित्त सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टची बरीच चर्चा होताना दिसत आहे.
यंदाच्या वारीच्या निमित्तानं उत्कर्ष शिंदेनं मागच्या दोन वर्षांचा अनुभव सांगताना भावुक पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. यासोबतच त्यानं एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. उत्कर्षनं आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, “दोन वर्षाचा लॉकडाऊन, हॉस्पिटल, पेशंट, घर करत काढलेले दिवस आणि आपल्याच गावी आपणच जाऊ शकत नाही. ना आपल्या गावची वारी पाहू शकतो. ह्या गोष्टींच दुःख आज कमी झालं. शूटिंग निमित्त गावी आलो मंगळवेढे इथे आजच शूटिंग संपवून सहकाऱ्यांच्या हट्टापायी सर्वाना पंढरपूर दर्शनास घेऊन आलो.”
आणखी वाचा- कौतुकास्पद! प्रसिद्ध अभिनेत्री करतेय वारकऱ्यांची सेवा, व्हिडीओ चर्चेत
उत्कर्ष पुढे लिहितो, “पंढरपूरला भेट देण्याचा योग आज आला आणि पाऊल ठेवेल तिथे मान सन्मान हार गळ्यात पडत होते आणि त्यातच आजोबा प्रल्हाद शिंदे यांचे स्वर कानी पडू लागले, “पाऊले चालती पंढरीची वाट” स्वतः ला धन्य मानतो ह्या गावचा ह्या तालुक्याचा ह्या मातीतला मी आणि इकडची पहाट त्याच प्रल्हाद शिंदेंच्या सुराने सुरु होते. ह्या उपर एका नातवाला काय हवं, जिथून तिथून आपल्याच आजोबांचा आवाज कानी पडतो. आपले आजोबा आपल्या सोबत सदैव आहेत ह्याची प्रचिती पंढरपूरला आलो कि झाल्याशिवाय राहत नाही.”
आणखी वाचा- “महाराष्ट्रावर आलेलं संकट दूर होऊन…”, वारीत सहभागी झालेल्या दिपाली सय्यद यांचे विठूरायाला साकडं
दरम्यान सोशल मीडियावर उत्कर्ष शिंदेचा बराच मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळेच त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. अनेकांनी या पोस्टवर कमेंट केल्या आहेत. या पोस्टसोबत शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये उत्कर्ष शिंदे पंढपूरच्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी जात असल्याचं दिसत आहे. त्याच्या गळ्यात तुळशीमाळा आणि हार घातलेले असल्याचं देखील या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे.