राजेंद्र सदाशिव निकाळजे उर्फ छोटा राजनचा अंडरवर्ल्डमधील उदय आणि त्याच्या जीवनातील रंजक घटना बॉलीवूडमधील अनेक चित्रपटांसाठीची प्रेरणा ठरली आहे. मुंबईच्या चेंबूर उपनगरात टिळक नगर कॉलनीतील एका मध्यमवयीन कुटुंबातील राजन सदाशिव निकाळजेने बघता बघता दाऊदच्या साम्राज्याला धडका देण्यास सुरुवात केली. दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा १९९९ मध्ये आलेल्या ‘वास्तव: द रिअॅलिटी’ या चित्रपटात सर्वप्रथम छोटा राजनच्या याच जीवनप्रवासाची झलक दिसली होती. या चित्रपटात अभिनेता संजय दत्तने रघुनाथ नामदेव शिवलकर या तरूणाची भूमिका साकारली होती. एका अपघातामुळे हा तरूण कशाप्रकारे गुन्हेगारी विश्वात ढकलला जातो, याची कहाणी ‘वास्तव’मध्ये दाखविण्यात आली होती. योगायोग म्हणजे राजनचा लहान भाऊ दिपक निकाळजे या चित्रपटाचा निर्माता होता. या चित्रपटाने प्रेक्षक आणि समीक्षकांकडून चांगलीच वाहवा मिळवली होती.
त्यानंतर २००२ मध्ये आलेला राम गोपाल वर्माचा ‘कंपनी’ या चित्रपटात दाऊद आणि छोटा राजनची मैत्री आणि शत्रुत्त्वाचे चित्रण करण्यात आले होते. दाऊद आणि छोटा राजन यांच्याशिवाय मुंबईच्या गुन्हेगारी विश्वाचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. एकेकाळी हातात हात घालून गुन्हेगारी विश्वाचे साम्राज्य उभे करणारे हे दोन मित्र मुंबईतील बॉम्बस्फोट मालिकेनंतर एकमेकांचे कट्टर शत्रू झाले. त्यांच्यात हा दुरावा कसा निर्माण झाला याची कहाणी राम गोपाल वर्माने ‘कंपनी’तून प्रभावीपणे मांडली होती. या चित्रपटातील अभिनेता अजय देवगणने एन. मलिक आणि विवेक ओबेरॉयने चंद्रकांत नागरे या माफियांची भूमिका साकारली होती. अंडरवर्ल्डवर आधारित असणाऱ्या ‘सत्या’ या चित्रपटाचा हा सिक्वेल होता. बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये दाऊद केंद्रस्थानी राहिला असला तरी अनेक या चित्रपटांमधून छोटा राजन आणि तेव्हाच्या गुन्हेगारी साम्राज्याची झलक दिसली आहे.
विधू विनोद चोप्रा यांच्या १९८९ मध्ये आलेल्या ‘परिंदा’ या चित्रपटापासून ते  ‘अग्निपथ’, ‘मकबूल’, ‘खलनायक’, ‘शुटआऊट अॅट वडाला’, ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’ या चित्रपटातून तत्कालीन गुन्हेगारी विश्वाचे चित्रण करण्यात आले होते.  ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’मध्ये अजय देवगणने हाजी मस्तानची भूमिका साकारली होती. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लवकरच अपूर्व लाखिया दिग्दर्शित ‘हसीना’ या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट दाऊदची बहीण हसीना पारकरच्या जीवनावर आधारित असल्याची चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा