मराठी अभिनेते वैभव मांगले अशा काही कलाकारांपैकी आहेत ज्यांनी आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळीच जागा निर्माण केली आहे. वैभव मांगले सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात आणि त्याचा बराच मोठा चाहतावर्ग सोशल मीडियावर आहे. ते नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करत असतात. सध्या सुरू असलेल्या फिफा विश्वचषकात जर्मनी विरूद्धचा सामना जपानने जिंकल्यानंतर वैभव मांगले यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.
सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असलेल्या वैभव मांगले यांनी जर्मनी जपान सामन्यानंतरचा स्टेडियममधला एका फोटो त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो खूपच बोलका आहे आणि संपूर्ण जगाला एक सकारात्मक संदेश देणारा आहे. या फोटोसह त्यांनी एक सुंदर कॅप्शनही लिहिलं आहे. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत असून आपल्या पोस्टमधून त्यांनी स्वच्छतेबाबत सकारात्मक संदेश दिला आहे.
आणखी वाचा-Video : “माझं नाव शाकाल नाही….” अभिनेते वैभव मांगले संतापले; पाहा नेमकं काय घडलं?
वैभव मांगले यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं, “जर्मनी विरुद्धचा फुटबॉल चा सामना जपान ने जिंकला. पण सामना संपल्यावर, सर्व लोक बाहेर पडल्यानंतर जपानच्या काही प्रेक्षकांनी तिथे झालेला कचरा साफ केला.. आपल्याकडे असं करणाऱ्यालाच अक्कल शिकवतील… आणि खुळ्यात काढतील… आलाय मोठा असंही ऐकवतात… मागे एकदा एका कारवाल्याने सिग्नलला प्लास्टिक बाटली टाकली… तर मी त्याला ती परत दिली तर “तुला काय प्रॉब्लेम आहे रे” म्हणून त्याने पुन्हा बाहेर टाकली… ती मी नंतर कचरा कुंडीत टाकली… मानसिकता बदलल्याशिवाय समाज बदलत नाही पर्यायाने देश बदलत नाही.”
आणखी वाचा- वैभव मांगलेचा ‘अलबत्या गलबत्या’ नाटकाला रामराम, जाणून घ्या कारण…
वैभव मांगले यांच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. त्यांची ही पोस्ट चर्चेत आहे. दरम्यान वैभव मांगले हे कायमच लोकप्रिय कलाकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी ‘अलबत्या गलबत्या’ या नाटकात चिंची चेटकीण ही भूमिका साकारली होती. वैभव मांगले यांनी अभिनय आणि दमदार संवादाने हे नाटक एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले. त्यांनी साकारलेली ‘चिंची चेटकीण’ तुफान गाजली. केवळ लहान मुलांनी नव्हे, तर मोठ्यांनीही या बालनाटयाला अप्रतिम प्रतिसाद दिला होता.