अभिनेता वैभव मांगले सध्या खूप चर्चेत आहे. त्याने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही काम केले आहे. ‘टाईमपास’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’, ‘काकस्पर्श’, ‘शिक्षणाच्या आयचा घो’, ‘फक्त लढ म्हणा’ अशा अनेक चित्रपटांमध्ये वैभवने महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. त्याने बऱ्याच गाजलेल्या नाटकांमध्येही काम केले आहे. वैभव अत्यंत स्पष्टवक्ता नट आहे. तो समाजातील वेगवेगळ्या विषयांवर व्यक्त होत असतो. सध्या अशाच एका वक्तव्यामुळे वैभव मांगले चर्चेचा विषय बनला आहे.
वैभव मांगले फेसबुक या सोशल मीडिया साईटवर खूप सक्रिय आहे. तो फेसबुकवर फोटो-व्हिडीओ पोस्ट करत असतो. लॉकडाऊनच्या काळात वैभवने चित्रकला जोपासली होती. तो सोशल मीडियावर त्याने काढलेली चित्रे देखील शेअर करत असतो. करोना काळामध्ये सरकारने सणांवर काही निर्बंध लादले होते. महामारीचे संकट ओसरल्यावर गणेशोत्सवासह सर्व सणांवरील बंधने काढण्यात आली. त्यामुळे यंदा गणेशोत्सव हा सण देशभरात दुप्पट जल्लोषात साजरा केला गेला. याच काळात अभिनेता वैभव मांगले याने फेसबुकवर केलेली पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.
“टिळकांनी याच साठी केला होता अट्टाहास…!” असे म्हणत वैभवने त्याच्या मनातील राग व्यक्त केला आहे. या पोस्टच्या खाली कमेंट बॉक्समध्ये त्याने “राजकारण्यांच्या हातात आपल्या धार्मिक, नैतिक, सामाजिक, आर्थिक नाड्या गेल्या आहेत हे आता तरी लोकांच्या लक्षात येईल का ??? आणि या आपणच दिल्या आहेत.” अशी कमेंट देखील केली आहे. या पोस्टच्या खाली काहीजणांनी वैभवच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे. त्याच्या या पोस्टखाली कमेंट केलेल्यांपैकी अनेकांनी गणेशोत्सवासंदर्भातले त्यांचे वाईट अनुभव मांडले आहेत. तसेच बऱ्याच जणांनी वैभवच्या मताला विरोध करत ‘आम्हाला शिकवू नका’ असे म्हटले आहे. त्याने पोस्टमध्ये स्पष्टपणे गणेशोत्सवाचा उल्लेख केला नसला, तरी त्याच्या या पोस्टचा गणेशोत्सवाशी संदर्भ जोडला जातोय, त्यामुळे यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
वैभव सध्या झी मराठी या वाहिनीवरील एका डान्स रियालिटी शोमध्ये सूत्रसंचालन करत आहे. त्याचा टाइमपास ३ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. याशिवाय वैभव मांगले अलबत्या गलबत्या नाटकामध्येही काम करत आहे.