नाटक पाहणारा प्रेक्षकवर्ग खूप मोठा आहे. आजही कित्येक ठिकाणी नाट्यगृहांच्या बाहेर हाऊसफुलचे बोर्ड लागतात. पण नाट्यगृहांमध्ये गैरसोय होते अशा कित्येक तक्रारी कलाकारांकडून ऐकायला मिळतात. नाट्यगृहांमध्ये होणाऱ्या गैरसोयीबाबत आता अभिनेता वैभव मांगलेंनी एक संतप्त पोस्ट शेअर केली आहे. सध्या वैभव ‘संज्या-छाया’ या नाटकामध्ये काम करत आहेत. पुणे, औरंगाबाद, नाशिक याठिकाणी नाटकाचे प्रयोग सुरू असताना आलेल्या अनुभवांबाबत त्यांनी भाष्य केलं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एसी नसलेल्या नाट्यगृहांमध्ये भर उकाड्यामध्ये ‘संज्या-छाया’च्या संपूर्ण टीमला नाटकाचा प्रयोग करावा लागला. याबाबत आलेला अनुभव सांगताना वैभव यांना राग अनावर झाला. ते म्हणाले, “पुणे, औरंगाबाद, नाशिक येथे प्रयोग ‘संज्या छाया’चे प्रयोग झाले. एकाही ठिकाणी वातानुकुलीत यंत्रणा काम करत नव्हती”.

आणखी वाचा – ‘तारक मेहता…’मधील जेठालालकडे खरंच आलिशान बंगला, महागड्या गाड्या आहेत का? अभिनेता म्हणतो, “मुंबईमध्ये…”

“रंग मंचावर एवढ्या प्रकाशात काम करताना प्रचंड उकाड्यात अतोनात त्रास झाला. प्रेक्षक डास आणि प्रचंड उकाड्यात (विशेषतः बालगंधर्व पुणे खूप डास आणि उकाडा, कोथरूड यशवंतराव उकाडा) प्रयोग पाहत होते. एका मर्यादेनंतर नाशिकमध्ये रसिकांचा राग, हतबलता अनावर झाली. त्यांनी गोंधळ केला. तिकिटाचे पैसे परत घ्यावे का? याचा विचार करू लागले”.

आणखी वाचा – सुदीप्तो सेन यांना ‘द केरला स्टोरी’च्या सिक्वेलची ऑफर, दुसऱ्या भागाच्या कथेबद्दल खुलासा करत म्हणाले…

काय म्हणाले वैभव मांगले?

“पण आपण ‘शो मस्ट गो ऑन’वाले लोक. आम्ही विनंती केली की, आम्हालाही त्रास होतच आहे. इथे येई पर्यंत माहित नव्हतं की, एसी नाही. आमचे निर्माते दिलीप जाधव यांनी १७ आणि २७चे शो रद्द केले. त्या हवेचे आवागमन नसलेल्या उकाड्यात प्रयोग पार पडला. कालिदासला तर उत्तर द्यायला ही अधिकारी जागेवर नव्हता. या सगळ्यात सगळ्यांची होलपट होतेय. कुणी कुणी आणि कुठे कुठे कशी दाद मागावी? विचारलं तर सांगतात एसी चालू आहे पण खूप गर्मी असल्याने एसी यंत्रणा नीट काम करत नाही. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात ही समस्या येत नाही. या सगळ्यावर काय बोलावं?” प्रचंड उकाड्याचा त्रास कलाकारांसह नाट्यरसिकांनाही सहन करावा लागला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vaibhav mangle talk about theater situation in mahrashtra says ac not working see details kmd