महागायिका वैशाली माडे बिग बॉसच्या घरातली एक स्ट्रॉंग स्पर्धक आहे. बिग बॉसच्या घरात सध्या तिची यशस्वी घोडदौड सुरू असताना, तिच्या मुलीचा वाढदिवस जवळ आला आहे. आपल्या मुलीचा वाढदिवस दरवर्षी थाटात साजरा करणारी वैशाली यंदा मात्र मुलीपासून दूर असणार आहे.
१९ जुलैला वैशालीच्या मुलीचा, आस्थाचा वाढदिवस आहे. जुलै महिना सुरू झाल्यावर वैशालीने यंदा आपण आस्थासोबत नसल्याची बिग बॉसमध्ये खंत व्यक्त केली होती. वैशाली म्हणाली, “आस्थाचा वाढदिवस असलेला महिना आता सुरू झाला आहे. दरवर्षी न चुकता तिचा वाढदिवस मी साजरा करते. यंदा ती अकरा वर्षाची होणार आहे. अकरा वर्ष कशी गेली कळलंच नाही. असं वाटतंय, ही चिमुकली आताच तर जन्माला आली होती. मी घरात असताना नेहमी माझ्या मागेपुढेच असते. आता यंदा ती कशी साजरा करेल तिचा वाढदिवस ?”
ह्यावर वैशालीच्या मुलीने तिच्यासाठी एक मेसेज रेकॉर्ड केलाय. आस्था म्हणते, “आईने आतापर्यंतचा माझा प्रत्येक वाढदिवस खास पद्धतीने साजरा केला आहे. वाढदिवसाच्यावेळी कोणतेही शो किंवा रेकॉर्डिंग न ठेवता ती माझ्यासोबतच वेळ घालवायची. यंदा मात्र मी तिला खूप मिस करेन. पण आई तू माझी काळजी करू नकोस. आजी यंदा माझा वाढदिवस साजरा करणार आहे. तू असंच चांगलं खेळत रहा. स्ट्राँग रहा आणि १ सप्टेंबरला मला तुझ्या हातात ट्रॉफी पाहायचीय.”