हॉलीवूड स्टार वाल किल्मर (Val Kilmer) यांचे ६५ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून ते कर्करोगाशी लढा देत होते. त्यांना गळ्याचा कॅन्सर झाला होता. आता त्यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. शेवटचे ते ‘टॉप गन : मेवरिक’मध्ये दिसले होते. विशेष बाब म्हणजे या चित्रपटात त्यांच्या या आजाराबद्दल सीन्स होते आणि त्या पात्राचे शेवटी निधन होते, असे या चित्रपटात पाहायला मिळाले होते. द न्यूयॉर्क टाइम्सने त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे.

हॉलीवूड अभिनेते वाल किल्मर यांनी ‘या; गाजलेल्या चित्रपटात केलेले काम

टॉम क्रुझ यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘टॉप गन’ या चित्रपटातून त्यांना प्रसिद्धी मिळाली. आइसमॅन ही भूमिका त्यांनी साकारली होती. १९९५ साली प्रदर्शित झालेल्या ‘बॅटमॅन फॉरएव्हर’ या चित्रपटात त्यांनी बॅटमॅन/ब्रूस वेन ही भूमिका साकारली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. त्यानंतरच्या ‘बॅटमॅन अँड रॉबिन’ या चित्रपटात जॉर्ज क्लूनीने ही भूमिका साकारली. याबरोबरच वाल किल्मर यांनी ‘द प्रिन्स ऑफ इजिप्त’ या हिट अॅनिमेटेड चित्रपटात मोसेस या पात्राला आवाज दिला होता. त्यांनी वेस्टर्न क्लासिक ‘टॉम्बस्टोन’मध्ये डॉक हॉलिडेची भूमिका साकारली.

‘द डोअर्स’ या चित्रपटात त्यांनी रॉक-स्टार जिम मॉरिसन ही भूमिका साकारली. त्यांची ही भूमिका चांगलीच गाजली होती. ही भूमिका त्यांच्या लोकप्रिय भूमिकांपैकी एक आहे. याबरोबरच दिग्दर्शक माइकल मान यांच्या ‘हीट’ मधील त्यांच्या भूमिकेलादेखील विशेष लोकप्रियता मिळाली होती. यामध्ये अल पचिनो आणि रॉबर्ट डी नीरोदेखील होते.

२०२१ ला प्रदर्शित झालेल्या ‘वाल’ या माहितीपटात किल्मर यांच्या आयुष्याबद्दल अनेक गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. या डॉक्युमेंटरीमध्ये त्यांच्या मुलाने आवाज दिला आहे. किल्मर यांच्या चित्रपटांनी जगभरात बॉक्स ऑफिसवर ३.५ अब्ज डॉलरपेक्षा जास्त कमाई केली आहे. लोकप्रिय समीक्षक रॉजर एबर्ट यांनी त्यांच्या पीढीतील आघाडीचा अभिनेता म्हणून वाल किल्मर यांचे कौतुक केले होते. मनोरंजनसृष्टीत त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.