व्हॅलेंटाइन डे म्हणजे एक असा दिवस ज्या दिवसाची अनेकजण आतुरतेने वाट पाहात असतात. अर्थात या अनेकजणांमध्ये वयाची, जाती धर्माची, रंगवर्णाची अशी कोणतीही मर्यादा नसते हेच खरं. प्रेमाचा उत्साह, प्रेमाचा रंग आणि एका वेगळ्याच जगताची सुखद अनुभूती देणारा हा दिवस म्हणजे व्हॅलेंटाइन डे. प्रत्येकाच्या जीवनात एकदातरी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जातात, वचनांची देवाणघेवाण होते आणि थोडेसे रुसवे फुगवेही असतातच. तुमच्या आमच्याप्रमाणेच कलाकारांच्या प्रेमाचेही असेच काहीसे किस्से आणि तारखांमध्ये गुंतलेल्या प्रेमाच्या आठवणी आहेत. सेलिब्रिटींच्या याच काही सुरेख आणि अविस्मरणीय आठवणींचा ठेवा आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने यंदा सेलिब्रिटींच्या प्रेमाच्या गावी एक फेरफटका मारायलाच हवा… चला तर मग साजरा करुया उत्साह प्रेमाचा.

माझी आणि हिमांशूची पहिली भेट झाली ती म्हणजे ‘इंडिज सिनेस्टार की खोज’ या रियालिटी शोमध्ये. माझ्या आणि हिमांशूच्या करिअरचा पहिला टप्पा म्हणजे झी टीव्हीवर लागणार हा रियालिटी शो होता. आम्ही दोघेही या रियालिटी शोचे पार्टिसिपन्ट्स तसेच खूप छान मित्र देखील होतो. आम्ही दोघेही वेगळ्या शहरातून आहोत त्यामुळे आमची लव्हस्टोरी ही ‘२ स्टेट्स’ चित्रपटाच्या प्लॉट सारखीच आहे. मी आणि हिमांशू खूप जास्त चांगले मित्र होतो आणि आमची मैत्री कधी प्रेमात बदलली ते आम्हाला कळलंच नाही. १० वर्षांच्या रिलेशनशिपमध्ये आम्ही खूप अप्स अँड डाउन्स एकत्र अनुभवले. घरच्यांच्या आग्रहावरून २०१५ साली आम्ही लग्नाच्या बेडीत अडकायचं ठरवलं आणि २४ जानेवारी २०१५ मध्ये आम्ही विवाहबद्ध झालो. माझा आणि हिमांशूचा स्वभाव अगदी विरुद्ध आहे, मी बोलकी आणि हिमांशू खूप शांत स्वभावाचा आहे. आमच्या संगीत सिरेमनीमध्ये हिमांशूने माझ्यासाठी ‘तेरा हिरो इधर है’ या गाण्यावर डान्स केला आणि मला त्याचा परफॉर्मन्स प्रचंड आवडला. कारण तो माझ्यासाठी खूप स्पेशल होता.

amruta-khanvilkar-and-himanshu-malhotra-1