व्हॅलेंटाइन डे म्हणजे एक असा दिवस ज्या दिवसाची अनेकजण आतुरतेने वाट पाहात असतात. अर्थात या अनेकजणांमध्ये वयाची, जाती धर्माची, रंगवर्णाची अशी कोणतीही मर्यादा नसते हेच खरं. प्रेमाचा उत्साह, प्रेमाचा रंग आणि एका वेगळ्याच जगताची सुखद अनुभूती देणारा हा दिवस म्हणजे व्हॅलेंटाइन डे. प्रत्येकाच्या जीवनात एकदातरी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या जातात, वचनांची देवाणघेवाण होते आणि थोडेसे रुसवे फुगवेही असतातच. तुमच्या आमच्याप्रमाणेच कलाकारांच्या प्रेमाचेही असेच काहीसे किस्से आणि तारखांमध्ये गुंतलेल्या प्रेमाच्या आठवणी आहेत. सेलिब्रिटींच्या याच काही सुरेख आणि अविस्मरणीय आठवणींचा ठेवा आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने यंदा सेलिब्रिटींच्या प्रेमाच्या गावी एक फेरफटका मारायलाच हवा… चला तर मग साजरा करुया उत्साह प्रेमाचा.
माझ्या आणि सनाच्या लग्नानंतरचा आमचा पहिला वॅलेंटाईन्स डे आहे. माझ्या आणि सनाच्या लव्हस्टोरी बद्दल सांगायचं झालं तर मी लहानपणापासूनच सनाला ओळखतो. सना ही अभिनेता आणि माजी क्रिकेटपटू सलील अंकोला यांची मुलगी आहे. आम्ही फॅमिली फ्रेंड्स असल्यामुळे सना आणि माझी मैत्री खूप जुनी आहे. हळू हळू त्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि तिला प्रपोज करण्यासाठी खास तिच्यासाठी मी स्वतः एक गाणं लिहिलं. माझ्या मित्राने ते गाणं चालबध्द केलं आणि मी ते गाणं स्वतः गाऊन सनाला सहा वर्षांपूर्वी प्रपोज केलं आणि सनाचा होकार मला मिळाला. त्यानंतर आमचं रिलेशनशिप अजून घट्ट झाली आणि १ डिसेंबर २०१६ ला आम्ही दोघे लग्नाच्या बंधनात अडकलो.