तामिळ अभिनेत्री वरलक्ष्मी सरथकुमार नुकतीच ‘हनुमान’ या तेलुगू चित्रपटामध्ये दिसली होती. आपल्या उत्तम अभिनयासाठी ओळखल्या जाणाऱ्या वरलक्ष्मीने एक्सवर केलेल्या एका पोस्टने लक्ष वेधून घेतलं आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) तिला अटक केल्याच्या खोट्या बातम्यांबद्दल तिने नाराजी व्यक्त केली आहे. तिला तिचा माजी मॅनेजर आदिलिंगमच्या ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आहे, असा दावा काही वृत्तांमध्ये करण्यात आला होता.
२०२३ मध्ये वरलक्ष्मीला एनआयएने समन्स बजावले होते, अशा बातम्या आल्या होत्या. त्यानंतर अभिनेत्रीने अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून ही खोटी बातमी असल्याचं म्हटलं होतं. आता परत एकदा अनेक अहवालांमध्ये वरलक्ष्मीला त्या प्रकरणात अटक करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे, त्यामुळे अभिनेत्रीने प्रतिक्रिया दिली आहे.
एक्स पोस्टमध्ये वरलक्ष्मीने लिहिलं, “हे खूप दुःखद आहे की आमच्या प्रतिभावान माध्यमांकडे जुन्या फेक न्यूज प्रसारित करण्यापेक्षा कोणतीही बातमी नाही. प्रिय पत्रकारांनो, खासकरून स्वयंघोषित न्यूज साइट्स, तुम्ही खरी पत्रकारिता का करत नाही? सेलिब्रिटींमधील दोष शोधणं थांबवा, आम्ही अभिनय करून लोकांचे मनोरंजन करण्याचा आणि आमची कामं करण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्ही तुमचं काम का करत नाही? हजारो गंभीर समस्या आहेत, ज्याकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. आम्ही बोलत नाही म्हणून कमकुवत समजू नका. मानहानी प्रकरणंही ट्रेंडिंग आहेत. बनावट आणि निराधार बातम्या प्रसारित करणं थांबवा आणि आम्हाला अभिमान वाटेल अशी पत्रकारिता परत आणा.”
तिच्या माजी मॅनेजरचं प्रकरण काय?
केरळमध्ये ३०० किलो हेरॉईन आणि एके ४७ बंदूक बाळगल्याप्रकरणी आदिलिंगमला अटक करण्यात आली होती. ही बातमी समोर आल्यावर वरलक्ष्मीचा संशयिताशी संबंध असल्याबद्दल टीका झाली. पण आपण त्याला फ्रीलान्स मॅनेजर म्हणून काम दिलं होतं आणि त्याच्या अटकेच्या बातमीने मलाही धक्का बसला आहे, असं वरलक्ष्मी म्हणाली होती.
वरलक्ष्मीबद्दल बोलायचं झाल्यास तिचा बॉयफ्रेंड गॅलरिस्ट निकोलाई सचदेवशी नुकताच साखरपुडा केला आहे. ती धनुषबरोबर त्याच्या आगामी ‘रायन’ या या चित्रपटात दिसणार आहे.