दाक्षिणात्य अभिनेत्री वरलक्ष्मी सरथकुमारने (Varalaxmi Sarathkumar) ३ जुलैला थायलंडमध्ये तिचा बॉयफ्रेड निकोलाई सचदेवशी लग्न केलं. तिने तिच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. लग्नानंतर आता निकोलाईने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. निकोलाई व त्याच्या पहिल्या लग्नापासून असलेली मुलगी दोघेही वरलक्ष्मीचं नाव व आडनाव लावणार असं तो म्हणाला.
चेन्नईत झालेल्या पत्रकार परिषदेत निकोलाई वरलक्ष्मीचं नाव घेत म्हणाला, “तिने (वरलक्ष्मी) सांगितलं की तिला लग्नानंतर तिचं नाव बदलायचं आहे. अर्थात, ती सरथकुमार नाव हटवणार नाही, पण तिला तिच्या नावात सचदेव जोडायचं होतं.”
निकोलाईनने सांगितलं की त्याची १५ वर्षांची मुलगी काशा सावत्र आईचं नाव लावेल व वारसा पुढे नेईल. तो म्हणाला, “तिचं नाव नेहमीच वरलक्ष्मी सरथकुमार राहील. मी तिचं नाव लावणार आहे. माझी ओळख निकोलाई वरलक्ष्मी सरथकुमार सचदेव अशी असेल. माझी मुलगीही वरलक्ष्मीचं नाव लावेल. त्यामुळे दिग्गज अभिनेते सरथकुमार आणि माझी पत्नी वरलक्ष्मी यांचा वारसा कायम राहील. हे मी माझ्या पत्नीसाठी करणार आहे.”
निकोलाईवर टीका करणाऱ्यांना अभिनेत्रीने दिलेलं उत्तर
घटस्फोटित निकोलाईसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याबद्दल वरलक्ष्मीला सुरुवातीला टीकेचा सामना करावा लागला होता. पण वरलक्ष्मीने यावर प्रतिक्रिया देत लोकांच्या टीकेचा तिच्या नात्यावर परिणाम होणार नसल्याचं म्हटलं होतं. “माझ्या वडिलांनीही दोन लग्नं केली, जोपर्यंत ते आनंदी आहेत तोपर्यंत त्यात मला काहीही चुकीचं वाटत नाही. लोक निकबद्दल कसे बोलतात ते मी ऐकलं आहे, पण माझ्या नजरेत तो देखणा आहे. आमच्या नात्याबद्दल नकारात्मक बोलणाऱ्या लोकांची मला पर्वा नाही. मी कुणालाही उत्तर का द्यावं? मी आधीपासूनच लोकांच्या टीकेला उत्तर देणं टाळलं आहे,” असं वरलक्ष्मी एका मुलाखतीत म्हणाली होती. वरलक्ष्मी ही ज्येष्ठ तमिळ अभिनेते सरथकुमार आणि त्यांची पहिली पत्नी छाया यांची मोठी मुलगी आहे.
वरलक्ष्मीने केलं निकोलाईचं कौतुक
निकोलाईतील काही आवडते गुण वरलक्ष्मीने सांगितले होते. “तो मला हसवतो, माझ्या करिअरमध्ये मला पाठिंबा देतो. तो मला प्राधान्य देतो. तो अत्यंत प्रेमळ आहे, माझे खूप लाड करतो. आम्ही खवय्ये आहोत. आम्ही १४ वर्षांपूर्वी भेटलो आणि आम्हाला जाणवलं की काहीतरी कनेक्शन नक्कीच आहे. पण तेव्हा आम्ही एकमेकांना डेट केलं नाही, आम्ही काही काळ मित्र म्हणून संपर्कात राहिलो आणि नंतर प्रेमात पडलो,” असं वरलक्ष्मीने सांगितलं.