मराठी चित्रपट सृष्टीतील सर्वपरिचित नाव असलेले निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर त्यांच्या आगळ्या-वेगळ्या स्टाईलमुळे चर्चेत असतात. मात्र, आता त्यांच्या नव्या मराठी चित्रपटाची बरीच चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली आहे. ही चर्चा चित्रपटातील बोल्ड दृश्यांमुळे होत असताना त्यामुळे महेश मांजरेकरांच्या चिंता मात्र वाढण्याची शक्यता आहे. ‘वरन भात लोनचा, कोन नाय कोनचा’ या त्यांच्या चित्रपटामधील आक्षेपार्ह दृश्यांमुळे थेट राष्ट्रीय महिला आयोगाने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे तक्रार केली आहे. चित्रपटातील महिला पात्र आणि अल्पवयीन मुलांची आक्षेपार्ह दृश्य असून ती काढण्यात यावीत, अशी मागणी राष्ट्रीय महिला आयोगाने केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाकडे केली आहे.
महेश मांजरेकर यांच्या या चित्रपटाची बऱ्याच काळापासून चर्चा सुरू होती. या चित्रपटाचा ट्रेलर १० जानेवारी रोजी म्हणजे दोनच दिवसांपूर्वी यूट्यूबवर रिलीज करण्यात आला. या ट्रेलरमधील दृश्यांवरून सध्या वाद सुरू झाला असून त्यावर राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रारी दाखल झाल्यानंतर आयोगानं देखील ती दृश्य चित्रपटातून काढून टाकण्याची मागणी केली आहे. तसेच, हा ट्रेलर तातडीने यूट्यूबवरून काढण्याची देखील मागणी केली आहे.
काय आहे या दृश्यांमध्ये?
या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये चित्रपटातील महिला आणि अल्पवयीन मुलाच्या पात्रांच्या काही आक्षेपार्ह दृश्यांवरून वाद सुरू झाला आहे. महाराष्ट्रातील भारतीय स्त्री शक्ती या संस्थेने चित्रपटातील दृश्यांवर आक्षेप घेत महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली. या चित्रपटात आणि ट्रेलरमध्ये महिला आणि अल्पवयीन मुलांना आक्षेपार्ह पद्धतीने दाखवण्यात आले असल्याचं या तक्रारीत म्हटलं आहे.
इथे पाहा चित्रपटाचा ट्रेलर!
यासोबतच, चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर कोणतंही वयाचं बंधन नसल्यामुळे सर्व वयोगटांना तो पाहाता येत आहे, असं देखील आयोगानं केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाला पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. हा चित्रपट एक क्राईम थ्रीलर आहे. आयोगाच्या पत्रानंतर आता चित्रपटाविषयी कोणता निर्णय घेतला जातो, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. अवघ्या दोनच दिवसांत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.