सुप्रसिद्ध गायक सुखविंदर सिंह यांच्या आवाजाचे लाखो लोक चाहते आहेत. त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये केवळ पंजाबीच नव्हे तर अनेक हिंदी गाणीही गायली आहेत. मात्र सध्या सुखविंदर हे एका व्हिडीओमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. यावरुन त्यांना अनेकांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी यामुळे धार्मिक भावनाही दुखावल्या गेल्याचा आरोपही केला आहे.
नुकतंच सुखविंदर सिंह यांच्या डान्सचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सुखविंदर हे बूट घालून हनुमान चालिसावर नाचताना दिसत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओवरुनच वादाला तोंड फुटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुखविंदर सिंह हे वाराणसीतील भेलूपूरच्या शिवाला येथील चेत सिंह किल्ल्यावर एका म्युझिक शूटसाठी गेले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे इतर सहकारीही हनुमान चालिसातील काही ओळींवर नाचताना दिसत आहे. यावेळी सुखविंदर हे छान धोती, कुर्ता या पोशाखात दिसत आहे. तर त्यांच्या इतर सहकलाकारांनी भगव्या रंगाचे कुर्ता परिधान केले आहे. या सर्वांच्या हातात भगवे झेंडे पाहायला मिळत आहे. या व्हिडीओच्या शूटिंगदरम्यान त्या सर्वांनी बूट घातले होते. या शूटींगचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. हे व्हिडीओ व्हायरल होताच वाद निर्माण झाला.
वाराणसीतील अखिल भारतीय संत समितीचे सरचिटणीस स्वामी जितेंद्रानंद सरस्वती यांनीही सुखविंदर सिंह यांच्या या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. “कोणत्याही बॉलिवूड कलाकारांनी शूटिंग करताना प्रतिष्ठेची विशेष काळजी घेतली पाहिजे. कोणाच्याही धार्मिक भावना दुखावू नयेत. आम्ही त्याच्या शूटिंगवर प्रश्न उपस्थित करत नाही. कारण त्याद्वारेच वाराणसीतील कलाकारांना कमाईची संधी मिळते. मात्र कलाकारांनीही आपली संस्कृती जपली पाहिजे”, असे ते म्हणाले. या व्हिडीओवर अनेकांनी सुखविंदर यांना ट्रोलही केले. अनेक नेटकऱ्यांनी तू हिंदूंच्या भावना दुखावल्यास असे म्हटले आहे. तर काहींनी त्यांना अप्रत्यक्षरित्या धमकी दिली आहे.
“अमृता तू माझ्यासाठी एखादी स्टार नाहीस तर…”, अंकिता लोखंडेने शेअर केलेली ‘ती’ पोस्ट चर्चेत
दरम्यान हा वाद निर्माण झाल्यानंतर लगेचच सुखविंदर सिंह यांनी याबाबत निवेदन जारी करत यावर स्पष्टीकरण दिले. बूट घालून हनुमान चालिसावर नाचण्याचा उद्देश कोणाच्याही भावना दुखावण्याचा नव्हता. कडक उन्हामुळे किल्ल्यावरील दगड खूप तापले होते. त्यामुळे कलाकारांनी बूट परिधान केले, असे सुखविंदर सिंह यांनी सांगितले.