खरा कलाकार ‘भरल्या सेटवर’ दिसतो.. त्यात तो अनुभवी व लोकप्रिय असेल तर विचारूच नका, तो ‘सेटवरच्या एकूणच परिस्थिती’शी पटकन जुळवून घेतो, वर्षां उसगावकरबद्दल तेच तर ‘पाह्य़ला’ मिळाले.
कांचन अधिकारी दिग्दर्शित ‘हू तू तू’ या कौटुंबिक मनोरंजन चित्रपटाचे मढ येथील एका बंगल्यात चित्रीकरण पार पडले. कांचनच्या दिग्दर्शनातील हा ‘सातवा चित्रपट’ असल्याने तिची ‘एक दृश्य झाले की पुढचे’ अशी कामावरची पकड स्पष्ट दिसत होती. (स्वत: कलाकारच दिग्दर्शक असल्याचाही हा सुपरिणाम) सेटवर कांचनसह अशोक सराफ, जीतेंद्र जोशी, हेमंत ढोमे, मानसी नाईक, नेहा पेंडसे व किती तरी ज्युनिअर आर्टिस्ट होते. अशा गर्दीत वर्षांला ‘दृश्याचा पोत’ पटकन पकडता आला. यात तिचा पती (अशोक सराफ) चक्क दुसरे लग्न करत असताना भरल्या मांडवात ती त्याला काहीबाही सुनावते.. वर्षांने ‘फक्त एकदा’ दृश्य समजावून घेतले व नंतर फर्मास अदाकारी साकारली. नवीन पिढीच्या अभिनेत्रींनी यापासून काही शिकावे म्हणावे तर वर्षांला मागील पिढीत ढकलले, असे होईल आणि या चित्रपटात ती दोन मुलांची (हेमंत व जीतेंद्र जोशीची) आई आहे याकडे लक्ष द्यावे तर तिच्या फिटनेसचे काय? त्यावर तिने आपले सौंदर्यही राखले आहे..‘तुझ्यावाचून करमेना’पासूनची वर्षांची वाटचाल पंचवीस वर्षांपेक्षाही जास्त व यशस्वी आहे. ‘गंमत जंमत’, ‘आत्मविश्वास’, ‘हमाल! दे धमाल’, ‘एक होता विदूषक’, ‘अबोली’, ‘पैसा पैसा पैसा’ हे तिचे अत्यंत महत्त्वाचे चित्रपट. पैज लग्नाचीमधील अभिनयासाठी तिने राज्य पुरस्कारही पटकावला. एवढा मोठा अनुभव तिच्या कामात दिसतो, हेच तर ‘हू तू तू’च्या सेटवरचे विशेष.

Story img Loader