चित्रपट दिग्दर्शक करण जोहरने त्याच्या ‘स्टूडंट ऑफ दी इयर’ या चित्रपटाच्या माध्यमातून काही नव्या चेहऱ्यांना बॉलिवूडमध्ये प्रवेश मिळवून दिला. या नव्या चेहऱ्यांपैकीच दोन नावाजलेली नावं म्हणजे अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री आलिया भट. या दोघांनी काही चित्रपटामध्ये स्क्रिन शेअर केली असून लवकरच ते एका नव्या चित्रपटात झळकणार आहेत.

वरुण आलियाच्या जोडीने ‘स्टुडंट ऑफ दी इयर’नंतर ‘हम्पटी शर्मा की दुल्हनिया’, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. त्यानंतर ही जोडी आगामी ‘कलंक’ या चित्रपटामध्ये झळकणार असून या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी हे दोघं लवकरच कारगील येथे जाणार आहेत.

मुंबईमध्ये गेल्या काही दिवसापासून या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु असून यातील काही भाग कारगीलमध्ये चित्रीत करण्यात येणार आहे. आलिया आणि वरुण लवकरच कारगीलसाठी रवाना होणार आहेत. या दोघांव्यतिरिक्त या चित्रपटामध्ये माधुरी दीक्षित, आदित्य रॉय कपूर आणि संजय दत्तदेखील दिसून येणार आहेत.

दरम्यान, या चित्रपटाचं चित्रीकरण नोव्हेंबरमध्ये पूर्ण होणार असून हा चित्रपट करण जोहरच्या धर्मा प्रोडक्शन अंतर्गत तयार करण्यात येत आहे. विशेष म्हणजे चित्रपटाचं कथानक १९४० च्या दशकातलं आहे.

 

Story img Loader