अभिनेता वरुण धवन त्याची पत्नी नताशासोबत मुंबई विमानतळावर दिसला. दोघेही अरुणाचल प्रदेशातून परतत होते. सोशल मीडियावर या दोघांचे व्हिडिओही व्हायरल होत आहेत. व्हिडिओमध्ये ते दोघे सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत असल्याचंही आढळून आलं. पण ज्यावेळी त्यांचे फोटो काढायला फोटोग्राफर्स त्यांच्या जवळ गेले तेव्हा वरुणने त्यांना चांगलंच सुनावलं.
वरुण विमानतळावरुन जात असताना फोटोग्राफर्स फोटोंसाठी त्यांच्या जवळ येत होते. त्यावेळी वरुण त्यांना म्हणाला, “प्लीज थोडं जबाबदारीने वागा. ही गर्दी तुमच्यापर्यंतच मर्यादित ठेवा”. त्याचबरोबर वरुणने त्यांना मास्क वापरण्याचंही आवाहन केलं आहे. करोनाच्या या परिस्थितीचं भान ठेवून वरुणने चाहत्यांसोबत पोज द्यायलाही नकार दिला. फोटोग्राफर वरिंदर चावलाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे.
View this post on Instagram
वरुण आपल्या आगामी ‘भेडिया या चित्रपटासाठी अरुणाचल प्रदेशात चित्रीकरण करत होता. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री क्रिती सेननही दिसणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण करुन वरुण परतत असताना त्याला फोटोग्राफर्सनी फोटोसाठी घेरलं. त्यावेळी तो त्यांच्याशी बोलला.
यापूर्वीही वरुणने आपल्या चाहत्यांना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आणि मास्क वापरण्याचे आवाहन केले होते. अरुणाचल प्रदेशात चित्रीकरण करत असताना त्याचे चाहते सेटवर आले होते आणि त्यांनी सेटवर गर्दी केली होती. त्यावेळी वरुणने त्यांना विनंती केली. तसंच त्याने हस्तांदोलन करण्यास आणि मिठी मारण्यासही नकार दिला होता.