‘सिटाडेल’ या गाजलेल्या आंतरराष्ट्रीय वेबमालिकेची भारतीय आवृत्ती कशी असेल? याबाबतीत प्रेक्षकांना निश्चितच उत्सूकता आहे. ‘सिटाडेल : हनी बनी’ या नावाने ही देशी आवृत्ती येत्या ७ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार असून त्याची पहिली झलक नुकतीच एका छोटेखानी समारंभात प्रदर्शित करण्यात आली. यानिमित्ताने, या वेबमालिकेतील मुख्य कलाकार जोडी अभिनेता वरुण धवन आणि सामंथा रुथ प्रभू हे दोघेही माध्यमांसमोर आले. या वेबमालिकेत वरुण धवनने पहिल्यांदाच गुप्तहेराची भूमिका केली असून आपल्या आजवरच्या भूमिकांपेक्षा ही गुप्तहेराची भूमिका अधिक आव्हानात्मक होती, असे वरुणने यावेळी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ‘ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट’चे देशभर प्रदर्शन; ‘कान’ महोत्सवात स्पर्धेतील विजेता चित्रपट २२ नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहांत

‘सिटाडेल: हनी बनी’ या वेबमालिकेत मी साकारलेले बनी हे पात्र माझ्या अन्य भूमिकांपेक्षा वेगळे आहे. यात मी गुप्तहेराची भूमिका केली आहे. गुप्तहेराची भूमिका करणं हे मला यावेळी अधिक आव्हानात्मक वाटलं, कारण कुठलाही गुप्तहेर मग तो कोणत्याही देशाचा असला तरी तो दुहेरी आयुष्य जगत असतो. इतकंच नाही तर त्याची ओळख दुहेरी असते तसंच त्याच्या व्यक्तिमत्वातील प्रत्येक पैलूला दोन बाजू असतात, असं वरुण सांगतो. त्याच्या आजवरच्या प्रेमी नायकाच्या रुढ प्रतिमांपेक्षा ही भूमिका नक्कीच वेगळी आहे. एखाद्या नायकाने दुहेरी भूमिका करणं वेगळं आणि एकाच व्यक्तिच्या दोन वेगवेगळ्या बाजू वा वेगवेगळे पैलू साकारणं हे खरंच कठीण असतं. त्यामुळे बनीची भूमिका करताना शारीरिक मेहनत घ्यावी लागली, मानसिक दृष्ट्या अधिक तयारी करावी लागलीच, पण यापलिकडेही या भूमिकेसाठी मला खूप वेगवेगळ्या गोष्टी कराव्या लागल्या, असं त्याने सांगितलं. प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणाऱ्या ‘सिटाडेल: हनी बनी’ या वेबमालिकेची झलक प्रदर्शित करण्यासाठी वरुण आणि सामंथा यांच्या बरोबर मालिकेची दिग्दर्शकद्वयी राज आणि डीके हेही उपस्थित होते.

ही आगामी वेब मालिका ‘सिटाडेल’ या जागतिक हेरगिरीवर आधारित वेब मालिकेचे भारतीय रुपांतर आहे. विशेष म्हणजे हॉलिवूडमधील या मूळ लोकप्रिय वेबमालिकेत अभिनेत्री प्रियांका चोप्राने मुख्य भूमिका साकारली असून तिचे या भूमिकेसाठी अमाप कौतुक झाले आहे. या वेब मालिकेत वरुण धवन आणि समंथा रुथ प्रभूसह के. के. मेनन, सिमरन, साकिब सलीम, सिकंदर खेर, सोहम मजुमदार, शिवंकित परिहार आणि काशवी मजमंदर यांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत. ‘सिटाडेल: हनी बनी’चे दिग्दर्शक राज आणि डीके यांच्या याआधीच्या ‘फर्जी’ आणि ‘गन्स अँड गुलाब’ या वेबमालिका लोकप्रिय ठरल्या. ‘सिटाडेल : हनी बनी’ हा आमच्यासाठी एक महत्त्वाचा प्रकल्प आहे, कारण या वेबमालिकेच्या निमित्ताने आम्हाला हेरगिरीच्या जगाविषयी अधिक जाणून घेण्याची संधी मिळाली. आम्ही आतापर्यंत केलेल्या अन्य कामांच्या तुलनेत ही वेबमालिका अधिक महत्वाची होती, कारण त्यामुळे रुसो ब्रदर्स सारख्या जगभरातील प्रतिभावान चित्रपट निर्मात्यांबरोबर काम करण्याची संधी मिळाली, असं राज आणि डीके यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Varun dhawan plays spy role for the first time in web series citadel honey bunny zws