ज्येष्ठ गायक संगीतकार वसंत आजगावकर (Vasant Ajgaonkar), त्यांचे सुपुत्र व गायक निनाद आणि निनाद यांची कन्या, वसंत आजगावकर यांची नात निरजा अशा तीन पिढ्यांनी सादर केलेल्या ‘आली कुठुनशी कानी टाळ मृदंगाची धून’ गाण्यात/ अभंगात संपूर्ण सभागृह तल्लीन झाले आणि सभागृहात ‘नाद विठ्ठल विठ्ठल’चा नामगजर झाला.
निमित्त होते आषाढी एकादशीच्या निमित्ताने स्वरनिनाद आणि सद्गुरुज् या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने दादर/ माटुंगा येथील यशवंत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या ‘नाद विठ्ठल विठ्ठल’ या कार्यक्रमाचे. ज्येष्ठ विधिज्ञ राजेंद्र पै विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमास निनाद आजगावकर यांचे वडील, ज्येष्ठ गायक संगीतकार वसंत आजगावकर उपस्थित होते. सोपानदेव चौधरी यांनी लिहिलेले आणि आजगावकर यांनी गायलेले व संगीतबद्ध केलेले ‘आली कुठुनशी कानी टाळ मृदंगाची धून’ हे गाणे आजही लोकप्रिय आहे.
या गाण्याचे मूळ गायक व संगीतकार सभागृहात उपस्थित आहेत, त्यांनी गाणे गायले तर? या विचाराने निनाद यांच्या पत्नी व आजगावकर यांच्या सुनबाई भावना यांनी आजगावकर यांना विचारणा केली आणि वयाच्या ८९ व्या वर्षांतील वसंत आजगावकर यांनी ती मान्य केली.
टाळ्यांच्या कडकडाटात वसंत आजगावकर व्यासपीठावर आले आणि दस्तुरखुद्द वसंतराव, त्यांचे सुपुत्र निनाद आणि नात निरजा यांनी हे गाणे गायले. आजगावकर यांनी गाण्याचे पहीले कडवे सादर केले आणि त्यानंतर पुढील गाणे निनाद व निरजा यांनी गायले. आणि रंगमंचावर तीन पिढ्यांनी गाणे सादर करण्याचा दुर्मिळ योग साधला गेला.
प्रासादिक आवाजाने या वयातही वसंत आजगावकर यांनी रसिक श्रोत्यांना विठ्ठल भक्ती आणि विठ्ठल नामात रममाण केले. तो आवाज आणि तेच गाणे मुलगा आणि नातीसह सादर झाले. जुन्या पिढीतील रसिक तो काळ आठवून स्मरणरंजनात रंगले तर आत्ताची तरुण पिढीही गाण्यात रंगून गेली.
‘नाद विठ्ठल विठ्ठल’ कार्यक्रमात निनाद आणि नीरजा यांनी विठ्ठल भक्तीगीते आणि अभंग सादर केले त्यांना शाश्वती आजगांवकर, शार्दूल महाडिक आणि उदय रेडेकर यांनी सहगायन तर विजय तांबे, मिलिंद परांजपे, तुषार आग्रे, सदानंद मुळीक, व्यंकटेश कुलकर्णी यांनी संगीतसाथ केली. कार्यक्रमाचे निवेदन रश्मी आमडेकर यांनी केले.
श्री सद्गुरू एज्युकेशन आणि वेल्फेअर ट्रस्टतर्फे सामाजिक कार्यात योगदान देणाऱ्या माधव नेत्रालय व अजित फाऊंडेशन या दोन संस्थांना या कार्यक्रमात ‘सद्गुरू दादा भागवत पुरस्कारा’ने गौरविण्यात आले.
© IE Online Media Services (P) Ltd