कमाल आर खान अर्थात केआरके हा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांसाठी आणि बॉलिवूडवर टीका करण्यासाठी प्रसिद्ध आहे. केआरकेने अनेक कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, अनेकांवर खालच्या दर्जाची टीका बऱ्याचदा केली आहे. यामुळे तो बराच चर्चेतही आला आहे. आता त्याला यावरुन मुंबई उच्च न्यायालयाने चांगलंच सुनावलं आहे.
या पुढे कमाल आर खान अर्थात केआरके निर्माता वाशू भगनानी यांच्या संदर्भात कसलीही टीकाटिप्पणी करु शकणार नाही. भगनानी यांनी केआरके विरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. भगनानी यांच्यावर अश्लाघ्य भाषेत ट्विट करत टीका केल्याबद्दल तसेच चुकीचे समज पसरवल्याबद्दल हा दावा करण्यात आला आहे.
यासंदर्भात भगनानी यांचे वकील अमित नाईक म्हणाले, “सोशल मीडिया या माध्यमाची ताकद मोठी आहे. एखाद्या माणसाला बदनाम करण्यासाठी त्याचा गैरवापर केला जाऊ शकतो. बदनामी आणि अपमान करणाऱ्या कमेंट्स, ट्विटस करण्यापासून कोर्टाने कमाल खानला रोखलं आहे. तसा आदेशही न्यायालयाने काढला आहे. हा केआरकेविरोधातला मुंबई उच्च न्यायालयाचा सलग तिसरा आदेश आहे.”
न्यायालयाच्या आदेशानुसार, केआरकेवर हा वाशू भगनानी यांच्याबद्दल, त्यांचा परिवार, त्यांचे प्रोजेक्ट्स, त्यांचा व्यवसाय यापैकी कशाबद्दलही सोशल मीडि़या अथवा अन्य कोणत्याही माध्यमातून टीकाटिप्पणी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
या प्रकरणादरम्यान न्यायालयाला असं आढळून आलं की केआरकेचे ट्विट्स हे एखाद्या समीक्षणासंदर्भातले नसून ते मानहानीकारक आहेत. यामधून वाशू भगनानी यांच्यासह त्यांच्या परिवारातले सदस्य, त्यांचा व्यवसाय, त्यांचे प्रोजेक्ट्स या सगळ्यावर अश्लाघ्य टीका करण्यात आली आहे. या प्रकरणात अमित नाईक, विरेंद्र तुळजापूरकर, रश्मीन खांडेकर आणि मधू गदोडिया या वकिलांनी भगनानी यांची बाजू मांडली.