‘मराठी रंगभूमीवर मालवणी बोलीभाषेतील नाटक आणून त्याचे तब्बल ४९२६ प्रयोग एकटयाने करण्याचा विक्रम माझे वडील आणि या नाटकाचे निर्माते मिच्छद्र कांबळी यांनी केला. या नाटकाने पाच हजार प्रयोगांच्याही पुढचा टप्पा गाठला आहे. या नाटकाचा ५२५५ वा प्रयोग नामवंत कलाकारांच्या संचात लवकरच रंगभूमीवर येणार आहे’ अशी माहिती निर्माते प्रसाद कांबळी यांनी दिली.
१६ फेब्रुवारी १९८० मध्ये रंगभूमीवर आलेल्या मिच्छद्र कांबळी निर्मित आणि अभिनीत ‘वस्त्रहरण’ या नाटकाला यंदा ४४ वर्ष पूर्ण झाली आहेत. मराठी माणूस आणि नाटक यांचं एक अजब असं मेतकूट आहे. त्यात तो माणूस कोकणातला मालवणकडचा असेल तर गोष्टच वेगळी. कारण कित्येक शतकांपासून इथे होत असलेली दशावतारी नाटके, शिमग्यातील खेळे, सोंगे, भारुडे कोकणातील कलाकारांनी आजवर जपलेली आहेत. शुद्ध मराठी भाषेतील व्यावसायिक नाटकांचा बोलबाला असताना कोकणात जन्मलेल्या एका मराठी मालवणी भाषिक माणसाने मालवणी बोलीभाषेतून ‘वस्त्रहरण’ हे नवंकोर नाटक रंगभूमीवर आणून रंगमंच आणि रसिकांसाठी मनोरंजनाचं नवं दालन उघडं केलं.
हेही वाचा >>> ‘सिंघम अगेन’, ‘डॉन ३’ आणि ‘शक्तिमान’..रणवीर सिंगचे तीन अॅक्शन अवतार
या नाटकाच्या १७५ व्या प्रयोगाला पु. ल. देशपांडे, लता मंगेशकर, आशा भोसले यांच्यासारख्या दिग्गजांनी हजेरी लावली होती. या नाटकाने पाच हजारांचा टप्पा गाठला, दुर्दैवाने हा विक्रमी प्रयोग वडिलांच्या हयातीत साजरा करता आला नाही. ते गेल्यानंतर २००९ साली त्यांची स्वप्नपूर्ती करण्याच्या उद्देशाने त्यावेळी नावाजलेल्या भरत जाधव, संजय नार्वेकर, प्रशांत दामले, जितेंद्र जोशी अशा कलाकारांना घेऊन ‘वस्त्रहरण’चा ५ हजारावा प्रयोग करण्यात आला होता. त्यावेळी विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे, सुशीलकुमार शिंदे, राज ठाकरे असे महाराष्ट्राच्या राजकारणातील दिग्गज नेते एकत्र आले होते, अशी माहिती प्रसाद कांबळी यांनी दिली. त्यानंतर आनंद इंगळे, अंशुमन विचारे, सुनील तावडे, पुष्कर श्रोत्री, दिगंबर नाईक, रेशम टिपणीस या प्रसिद्ध कलाकारांच्या संचात ‘वस्त्रहरण’चे नव्याने काही प्रयोग करण्यात आले होते, असेही त्यांनी सांगितले. व्यावसायिक मराठी रंगभूमीवर इतिहास घडविलेल्या ‘वस्त्रहरण’ या अजरामर कलाकृतीला ४४ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भद्रकाली प्रॉडक्शन्स पुन्हा एकदा मान्यवर कलाकारांच्या संचात रंगमंचावर नव्याने ‘वस्त्रहरण’चे प्रयोग रंगवणार आहे. आताचा ५२५५ वा प्रयोग मोठया दिमाखात संपन्न होणार असून त्यानंतर ४४ मोजके प्रयोग होतील आणि मग पुन्हा नाटकाच्या प्रयोगांना अर्धविराम देण्यात येईल, असं कांबळी यांनी स्पष्ट केलं.