रेश्मा राईकवार

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रेमाची गोष्ट म्हटल्यावर त्यात पहिल्याच नजरेत मनात घर करणारी ती, मग हळूहळू एकमेकांचं एकत्र येणं, कुठलं खलनायकी विघ्न आडवं आल्याने प्रेमाला लागणारी नजर, मग विरह अशा सगळय़ा गोष्टींचा योग्य तो आणि तितका मसाला आवश्यक असतो. त्याला उत्तम अभिनयाची जोड असेल तर सोने पे सुहागा.. आणि एकाच गोष्टीत दोन-दोन अशा जबरदस्त भावनिक प्रेमाच्या गोष्टी असतील तर डबल धमाका. हे सगळं यशस्वीपणे जमवून आणण्याचं गणित दाक्षिणात्य चित्रपटांना पुरेपूर जमलं आहे. पण त्यांच्या यशस्वी गोष्टीचा चांगला रिमेक बनवणं सगळय़ांनाच साधतं असं नाही. दिग्दर्शनाचं ‘वेड’ मनात घेऊन आलेल्या रितेश देशमुखनं रिमेकचं हे शिवधनुष्य पेलणं पहिल्याच प्रयत्नात साधलं आहे.

प्रेमात माणूस वेडा होतो की खरोखरच जगावेगळी माणसं असं वेडं प्रेम करतात.. असो या दोन्ही पध्दतीचं प्रेम ‘वेड’ चित्रपटात पाहायला मिळतं. ‘मजिली’ या तेलुगू चित्रपटाचा मराठी रिमेक असलेल्या या चित्रपटात खरंतर समांतर सुरू असलेल्या पण आपल्याला पूर्वार्धात एक आणि उत्तरार्धात एक समजणाऱ्या-दिसणाऱ्या दोन प्रेमकथा आहेत. सत्या हा या चित्रपटाचा नायक. मनस्वी स्वभावाचा, क्रिकेटपटू होण्याचे स्वप्न उराशी बाळगून असलेला सत्या आणि त्याचा मित्र जाँटी यांचं एरव्हीचं साधं-सरळ विश्व निशाच्या त्यांच्या आयुष्यात अचानक होणाऱ्या एन्ट्रीने बदलतं. निखळ, बिनधास्त, काहीशी खटय़ाळ निशा पहिल्याच फटक्यात सत्याला आवडते. सुरुवातीला दोघांमध्ये आलेले काही गैरसमजुतीचे ढग बाजूला सरतात आणि त्यांचं प्रेम हळूहळू बहरायला लागतं.

जे हवं आहे ते मिळवण्यासाठी हरएक प्रयत्न करणारा सत्या आणि एखादी गोष्ट मिळवण्याचा अट्टहास तोपर्यंतच करावा जोवर ती मिळण्याची आशा आहे, हे म्हणणारी निशा अशा दोन टोकाच्या स्वभावाचे हे दोन जीव एकमेकांत विरघळायला लागतात आणि तेव्हाच त्यांच्या प्रेमाला खलनायकी नजर लागते. अर्थात, इथे मुळातच या खलनायकी कृत्यातून जे काही भयंकर नाटय़ उभं करता आलं असतं त्याला कथेत काही प्रमाणात आवर घातला आहे. त्यामुळे चित्रपट उगीच अंगावर येत नाही हा एक दिलासा. तर या प्रेमकथेचा शेवट जिथे होतो तिथे दुसरी प्रेमकथा सुरू झालेली असते. एकमेकांवर खूप जीव असलेल्या सत्या आणि निशाचं निरलस प्रेम एकीकडे तर दुसरीकडे ज्याच्यावर आपण मनापासून प्रेम करतो त्याच्या मनोविश्वात आपल्याला कणभरही स्थान नाही हे जाणूनही सत्याच्या संसाराचा धागा आपणहून जोडून घेणाऱ्या श्रावणीचं निव्र्याज प्रेम या दोन्ही गोष्टी तशा मनाला थेट भिडणाऱ्या.. त्याला जोड मिळाली आहे ती उत्तम अभिनयाची आणि अर्थपूर्ण-भावगर्भ अशा संवादांची.

आपल्याबद्दल ज्याच्या मनात प्रेमही नाही आणि रागही नाही अशा व्यक्तीवर प्रेम करण्याचं दु:ख तुम्हाला नाही कळायचं, म्हणत आपलं मन सहज उलगडणारी श्रावणी. वर म्हटल्याप्रमाणे साध्या-सरळ शब्दांत आपले व्यावहारिक विचार सत्याला सांगणारी निशा, तुझ्यावर जे आहे त्याला प्रेम नाही वेड म्हणतात अशा शब्दांत आपलं निरातिशय प्रेम व्यक्त करणारा सत्या.. यातली प्रत्येक व्यक्तिरेखा ही या संवादातून थेट उलगडत जाते. आणि त्याचं श्रेय हे लेखक प्राजक्त देशमुख यांच्या काहीशा काव्यात्म आणि तितक्याच भावगर्भ संवादांना आहे. रितेश देशमुख याचा दिग्दर्शनातील पहिलेपणा जाणवू नये इतकी प्रभावी तांत्रिक मांडणी यात आहे. दोन प्रेमकथा फुलवताना पहिला भाग काहीसा जास्त ताणला जातो, मध्यापासून चित्रपट खऱ्या अर्थाने पकड घेतो. तुलनेने पहिल्या भागापेक्षा दुसऱ्या भागात व्यक्तिरेखा अधिक असूनही कथा वेगाने सरकत राहते.

चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखेसाठी योग्य कलाकाराची निवड ही या चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू. अशोक सराफ आणि विद्याधर जोशी या मातब्बर कलाकारांची जुगलबंदी या भावनाटय़ात आपल्या चेहऱ्यावर काही क्षणांसाठी का होईना हसू फुलवणारी आहे. या व्यक्तिरेखा कथानकातही सुंदर मांडल्या आहेत. जिया शंकर या अभिनेत्रीचा आत्मविश्वासपूर्ण, प्रसन्न वावरही पहिल्या प्रेमकथेला ताजेपणा देऊन जाणारा, किंबहुना इथे रितेश काही प्रमाणात पडद्यावरील वयाच्या बंधनात अडकलेला वाटतो. त्यापेक्षा शाळेच्या प्रसंगात आणि प्रेमभंगानंतरचा सत्या म्हणून तो सहजपणे वावरला आहे. जेनेलियाला इतक्या वर्षांनी चित्रपटात पाहणं हाच दुर्मीळ आणि सुंदर अनुभव आहे. तिचा सहज अभिनय आणि प्रसन्न वावर दोन्ही गोष्टी अनुभवाव्यात अशा.. हा परिपूर्ण रिमेक अजिबात नाही. मसाला चित्रपटांच्या चौकटीत बसेल असा हा रिमेक ‘वेड’ लावणाराही नाही.  पण प्रेमात आकंठ बुडालेल्या माणसांचं हे ‘वेड’ पडद्यावर अनुभवायला हरकत नाही.

वेड

दिग्दर्शक:  रितेश विलासराव देशमुख

कलाकार:  जेनेलिया देशमुख, जिया शंकर, रितेश देशमुख, शुभंकर तावडे, अशोक सराफ, विद्याधर जोशी, विक्रम गायकवाड, खुशी हजारे, विनीत शर्मा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ved movie bollywood love of madness interesting the thing to the movies ysh