काही दिवसांपूर्वी दुबई स्थित उद्योगपतीशी विवाह करण्याचा निर्णय घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का देणारी पाकिस्तानची अभिनेत्री वीणा मलिक आता मात्र चांगलीच अडचणीत सापडली आहे. वीणाच्या कथित बॉयफ्रेंडने तिच्या विरोधात पोलिसांत तक्रार दिली आहे.
वीणाच्या टीममध्ये कामकरणाऱ्या प्रशांत प्रताप सिंग याने तो व वीणा लिव्ह इन पार्टनर असल्याचा दावा केला आहे. दोघे त्यांच्या नात्याला पुढे नेत लवकरच लग्न करणार होते असा आरोप प्रशांत प्रताप सिंग याने केला आहे. वीणाने दुबई स्थित उद्योगपती असाद खानशी विवाह करून प्रशांत सिंगला जोरदार धक्का दिला आहे. काही काळापासून वीणासोबत मुंबईमध्ये रहात असल्याचे आणि वीणाने त्याला व त्याच्या आईला धमकावले असल्याचे प्रशांत याने तक्रारीमध्ये म्हटले आहे.
दुसरीकडे वीणाने मात्र, प्रशांत सिंगचा हा दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. प्रशांत सिंग हा १०,००० रूपये प्रती महिना पगारावर तिच्याकडे कामाला असल्याचे व त्याचा गुन्हा दाखल करण्यामागचा हेतू अद्याप तीला उलगडला नसल्याचे वीणाने सांगितले आहे.
पोलिसांनी वीणाच्या विरोधामध्ये भारतीय दंडविधानाच्या कलम ५०७ अंतर्गत तक्रार नोंदवली आहे.             

Story img Loader