ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करतांना म्हटले आहे.
नुकतंच खुद्द अशोक सराफ यांनी या पुरस्कार जाहीर झाल्यानंतर यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘टीव्ही ९ मराठी’शी संवाद साधताना अशोक सराफ म्हणाले, “माझ्या मनात अत्यंत संमिश्र भावना आहेत. हा पुरस्कार मिळणं ही अत्यंत मानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. आजवर ज्या थोर लोकांना हा पुरस्कार मिळाला आहे आज मला त्यांच्या बरोबरीने नेऊन बसवलं आहे ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. ‘महाराष्ट्र भूषण’ हा महाराष्ट्राचा नंबर वन पुरस्कार आहे असं मी समजतो. गेली ५० वर्षं मी चित्रपट, नाटक, मालिका करतोय त्यातली मेहनत कुठेतरी सत्कारणी लागली अन् प्रेक्षकांनीही त्याला दाद दिली त्याचा मला प्रचंड आनंद आहे.”
पुढे अशोक सराफ म्हणाले, “आता यापुढेही आणखी वेगळं आणि नवं काम करायचा हुरूप आला आहे. त्यामुळे अधिकाधिक उत्तम काम करत राहीन कारण आज मी जो काही आहे तो तुम्हा प्रेक्षकांमुळे आहे अन् तुम्ही आहात म्हणून मी आहे. यासाठी मला काम करत रहावंच लागणार.” याबरोबरच त्यांनी आपल्या पत्नीला म्हणजेच निवेदिता सराफ यांना झालेला आनंद याबद्दलही भाष्य केलं, शिवाय मराठी चित्रपटसृष्टीतील आपले मित्र व उत्कृष्ट दिवंगत अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांचीही अशोक सराफ यांनी आठवण काढली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या एक्स हँडलवरुन ही माहिती दिली आहे. अशोक सराफ यांनी विनोदी, गंभीर आणि खलनायकी भूमिकाही साकारल्या आहेत. तसंच आपल्या अभिनयातून रसिकांच्या मनावर राज्य गाजवलं आहे. अशोक सराफ हे एक लोकप्रिय अभिनेते आहेत. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी त्यांची कारकीर्द गाजवली आहे. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांची जोडी खूप गाजली होती. आत्तापर्यंत अशोक सराफ यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे.