ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांनी आज अखेरचा निरोप घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. दिलीप कुमार यांच्या जाण्याने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. अभिनेते आणि त्यांचे चाहते दिलीप कुमार यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. गायक-संगीतकार अवधूत गुप्ते यानेही दिलीप कुमारांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याने दिलीप कुमार यांना अभिवादन करताना त्यांच्या आजीबद्दलची आठवण सांगितली.
दिलीप कुमार यांचं निधन झाल्याच्या वृत्ताने बॉलिवूडसह त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली. महानायक अमिताभ बच्चन यांच्यापासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सर्वसामान्य चाहत्यांनी दिलीप कुमार यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. त्यांच्या जाण्यामुळे त्यांच्याविषयीच्या वेगवेगळ्या घटनांचीही चर्चा होतेय. वेगवेगळ्या आठवणी जागवल्या जात आहेत. गायक-संगीतकार अवधूत गुप्ते यानेही दिलीप कुमार यांना ट्विटकरून श्रद्धांजली वाहिली.
संबंधित वृत्त- ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांचं निधन
“खरं तर दिलीप साहब म्हणजे आमच्या तीन पिढ्या आधीचे सुपरस्टार! त्यामुळे त्यांचं ग्लॅमर त्यांच्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना आम्ही नाही पाहिलं. परंतु, त्यांचं नाव घेतल्यावर वयाच्या सत्तरीतही आजीच्या सुरकुतलेल्या गालांवर येणारी लाली आजही आठवते.. ॐ शांती!!,” अशी आठवण सांगत अवधूत गुप्ते याने दिलीप कुमार यांना श्रद्धांजली अर्पण केली.
खरं तर दिलीप साहब म्हणजे आमच्या तीन पिढ्या आधीचे सुपरस्टार! त्यामुळे त्यांचं ग्लॅमर त्यांच्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना आम्ही नाही पाहिलं. परंतु, त्यांचं नाव घेतल्यावर वयाच्या सत्तरीतही आजीच्या सुरकुतलेल्या गालांवर येणारी लाली आजही आठवते.. ॐ शांती!! https://t.co/0EazngGEXP
— Avadhoot Gupte (@AvadhootGupte) July 7, 2021
महानायकाने वाहिली श्रद्धांजली
बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांनीही दिलीप कुमार यांना श्रद्धांजली वाहिली. अमिताभ बच्चन यांनी ट्विट केलं आहे. ज्यात ते म्हणतात, “जेव्हा भारतीय सिनेमाचा इतिहास लिहिला जाईल, तेव्हा तो ‘दिलीप कुमार यांच्याआधी आणि दिलीपकुमार यांच्यानंतर’ असा लिहिला जाईल. त्यांच्या आत्म्यास शांती मिळो”, अशा शब्दात अमिताभ बच्चन यांनी दिलीप कुमार यांना श्रद्धांजली अपर्ण केली आहे.