काही वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून दूर असलेले ज्येष्ठ अभिनेते कादर खान यांची प्रकृती गंभीर आहे. कॅनडातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कादर खान यांना श्वास घेण्यास अडचण येत असल्याने त्यांना BiPAP व्हेंटिलेटर लावण्यात आले आहे. कादर खान यांचा मुलगा सरफराज खान आणि त्यांची सून शाहिस्ता खान यांनी ही माहिती दिली आहे. गेल्या काही वर्षांपासून कादर खान हे मुलगा आणि सूनेसोबत कॅनडामध्येच आहेत.

पडद्यावर दमदार अभिनय सादर करणाऱ्या, प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या कादर खान यांनी जवळपास ३०० हून अधिक चित्रपटांत काम केले आहे. अभिनेता आणि लेखक म्हणून बॉलिवूडमध्ये त्यांनी चांगलेच नाव कमावले आहे. कादर खान यांच्या नावावर एकेकाळी चित्रपट चालत असत.

कादर खान यांनी ‘डाग’ या चित्रपटापासून त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी ‘कुली’, ‘होशियार’, ‘हत्या’ यांसारख्या अनेक चित्रपटांचे लेखन केले. नव्वदीच्या तर अनेक चित्रपटांमध्ये आपल्याला त्यांना पाहायला मिळाले होते. त्यांना त्यांच्या अभिनयासाठी आणि लिखाणासाठी आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. चित्रपटसृष्टीत आपल्या धमाल अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या कादर खान यांच्या प्रकृतीविषयी माहिती मिळताच प्रेक्षकांनीही चिंता व्यक्त केली.

 

 

Story img Loader