श्रीमंत घराणे असलेले देशमुख कुटुंब कसे आहे, किती भिन्न स्वभावाचे व्यक्ती त्या कुटुंबात राहतात याची कल्पना प्रेक्षकांना आलीच आहे. मंजूच्या बाबतीत देशमुख कुटुंबांनी प्रत्येकवेळी अडचणी उभ्या केल्या, तिला कमी लेखले, तिचा अपमान केला याविषयी नाराजी आणि राग मंजूच्या मनात नक्कीच असणार आहे.

आता ‘ती फुलराणी’ या मालिकेत अशा एका नवीन व्यक्तीची एण्ट्री होणार आहे. ज्याला श्रीमंत, भांडवलशाही वृत्तीच्या माणसांबद्दल अतिशय तिटकारा आहे आणि विशेष करुन देशमुख कुटुंबाबद्दल प्रचंड संतापही आहे आणि ती व्यक्ती म्हणजे ‘जगदीश महापात्रे’.वय सत्तरीच्या आसपास असलेले, रुबाबदार, देखणं व्यक्तीमत्त्व, बुद्धीमान असलेल्या जगदीश महापात्रे ही भूमिका ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांनी साकारली आहे.

जगदीश महापात्रे यांनी मानववंशशास्त्रामध्ये पीएचडी केली आहे, माणसांचा, राहणीचा, संस्कृतीचा सखोल अभ्यास केला आहे. ते जरी हुशार असले तरी त्यांचा स्वभाव फार विचित्र आहे. कधी काय विचार करतील, काय बोलतील याचा नेम नाही. इतकेच नव्हे तर बेधडकपणे बोललो, वागलो तर समोरच्याला काय वाटेल याचा विचारही ते करत नाही. बाहेरुन कितीही कडक वाटले तरी ते मनाने संवेदनशील आहेत. हुशार, स्वतंत्र, स्वाभिमानी माणसांबद्दल त्यांना आदर आहे. असं असूनही त्यांना लहानपणापासून त्यांच्या आईकडून एकच वाक्य ऐकू आलंय की, देशमुखांमुळे त्यांच्या कुटुंबाचे हाल झाले, त्यामुळे त्यांचा देशमुख कुटुंबावर अजूनही राग आहे. पण देशमुखांशी त्यांचा संबंध काय, त्यांच्यावर काय अन्याय झाला आहे याचा शोध लवकरच शौनक आणि मंजू घेणार आहेत.

Story img Loader