मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचं दोन दिवसांपूर्वी निधन झालं. ते ७५ वर्षांचे होते. सुनील शेंडे यांनी मराठी चित्रपटसृष्टीसह अनेक हिंदी चित्रपटात भूमिका साकारल्या होत्या. सुनील शेंडे घरातच चक्कर येऊन पडले. यामुळे त्यांच्या शरीरात अंतर्गत रक्तस्राव झाल्याने त्यांचे निधन झाल्याची माहिती त्यांची सून जुईली शेंडे यांनी दिली. त्यांनी रात्री १ वाजता विलेपार्ले येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. सुनील शेंडेंच्या निधनानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. नुकतीच त्यांच्या सुनेने याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. ती सध्या व्हायरल होत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांची सून जुईली शेंडे यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. जुईली शेंडे या राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. मी राजकारणात प्रवेश करतेय हे कळल्यावर त्यांनी मला पाठिंबा दर्शवला होता. सून म्हणून नाही तर अगदी आपल्या मुलीप्रमाणेच त्यांनी तिच्यावर वडिलांसारखे प्रेम दिलं होतं. सुनील शेंडे यांनी अभिनय क्षेत्रातून काढता पाय का घेतला? याचेही कारण जुईली यांनी तिच्या पोस्टमध्ये सांगितले.
आणखी वाचा : ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचं निधन; ‘गांधी’सह ‘वास्तव’ चित्रपटात साकारल्या होत्या भूमिका

जुईली शेंडेची पोस्ट

सुनील शेंडे गेले…
खरं आहे का?
असं विचारणारे बरेचसे फोन मला सकाळपासून आले.. हल्ली कशावर विश्वास ठेवायचा हे कळतच नाही म्हणून विचारून कन्फर्म करतोय असं सांगणारी समोरची माणसं..
पण खरंच विश्वास न बसण्यासारखी बातमी..
सुनील शेंडे उर्फ डॅडी हे खरं तर माझे सासरे पण त्यांच्या बायको आणि मुलांपेक्षा त्यांनी माझ्यावर जास्त प्रेम केलं हे ते सर्व पण मान्य करतील..
प्रत्येक छोटी छोटी गोष्ट सुद्धा ते मला विचारायचे.. छोटी छोटी FB पोस्ट सुद्धा मला वाचून दाखवायचे.. माझ्या हजार दगडांवर पाय ठेवण्याचं भारी कौतुक होत त्यांना..
स्वतःच्या बायकोला नोकरी न करू दिलेले ते.. मी राजकारणात उतरण्याचा घेतलेला निर्णय सहज मान्य केला त्यांनी.. फक्त आणि फक्त माझ्यावरच्या प्रेमापोटी…
एके काळी दिवसाला अख्ख पनामा पाकिट ओढणारे ते.. हल्ली दिवसाला एक सिगरेट पुरवायचे.. पण मला हक्काने सांगायचे की जरा घेऊन येशील का ग पाकिट.. मी म्हणायचे डॅडी तो नाक्यावरचा दिनेश शेट्टी म्हणणार आहे की शेंडेंची सून हल्ली आईस बर्स्ट ओढायला लागली वाटतं.. मग एक ऍक्टिंगचा खुन्नस द्यायचे..
हल्ली एक पुरते ग मला असं म्हणाले की मलाच मनात कुठेतरी खुट्ट व्हायचं.. कशाला एवढा कंजूस पणा हा माझा प्रश्न.. ते म्हणायचे एवढीच गरज आहे..
खूप साऱ्या आठवणी… खूप साऱ्या गोष्टी…
पाच-सात वर्षांपूर्वी आता मी एक्टिंग करणार नाही अस एक दिवस जाहीर करून टाकलं त्यांनी…
म्हणाले हि हल्लीची मुलं सारखं ऑडिशन द्या ऑडिशन द्या पाठी लागतात, कुठेतरी पटत नाही ग..
एवढं काम मी केलं, त्याच्यातलच एखादं काम बघा की.. काही गोष्टी नाही पटायच्या त्यांना.. आणि पटल्या नाहीत त्या गोष्टी त्यांनी कधीच केल्या नाहीत..
लग्नाआधी अटल नॉनव्हेज खाणारी मी..लग्नानंतर घरात माझी आई आहे आणि अंड पण शिजवलेलं मला चालणार नाही असं सांगणारे ते…
जेव्हा एक नात झाली तेव्हा म्हणाले अंड लहान मुलांच्या तब्येतीला चांगलं असतं देत जा तिला मध्ये मध्ये एखादं.. माझ्या दोन्ही मुलांना त्यांच प्रचंड प्रेम मिळालं..
एरवी अतिशय कठोर वाटणारा माणूस गाणं गाऊन माझ्या लेकीला झोपवायचा असं कोणाला सांगितलं तर खरं वाटणार नाही..
जरी काही सिरीयल्स आणि काही मुव्हीज साठी त्यांना प्रसिद्धी मिळाली तरी त्यांनी खूप सारं, वेगवेगळ्या धाटणीचं, अप्रतिम काम केलं..
खाली काही फोटो जोडत आहे त्यात त्यांनी केलेल्या कामाचा आलेख घेण्याचा, त्यांच्याच सोबतीने एक केलेला, प्रामाणिक प्रयत्न. (जो त्यांना पटलाच नव्हता)….
एवढ्याच साठी की एक-दोन चित्रपटांसाठी लक्षात न राहता त्यांनी केलेल्या शेकडो चित्रपट, मालिका आणि नाटकांसाठी सुद्धा त्यांचं नाव लक्षात राहावे..
एखाद्या अभिनेत्यासाठी त्यांनी केलेली काम लोकांपर्यंत पोहोचवणं यापेक्षा मोठे श्रद्धांजली काय असू शकते?
मला तुमची आठवण येईल बाबा… तुम्ही नेहमी माझ्या विचारात आणि मनात राहाल..
तुमचीच लाडकी जुईली, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम कल्याणी कुरळेला ट्रॅक्टरची धडक, अभिनेत्रीचा जागीच मृत्यू

दरम्यान मराठी रंगभूमीवरील सशक्त अभिनेता अशी त्यांची ओळख होती. सुनील शेंडे यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटातून वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. त्यांचे रुबाबदार व्यक्तिमत्त्व आणि खडा आवाज यामुळे पोलीस, राजकारणी अशा विविध भूमिकांतून ते लोकांच्या लक्षात राहिले.

सुनील शेंडे यांनी सरफरोश, गांधी, वास्तव या चित्रपटात सहाय्यक भूमिका साकारल्या होत्या. त्यांच्या या भूमिका प्रेक्षकांमध्ये चांगल्याच लोकप्रिय झाल्या होत्या. त्यांनी ९० च्या दशकात अनेक चित्रपटात काम केले आहे. ‘निवडुंग’ (१९८९), ‘मधुचंद्राची रात्र’ (१९८९), ‘जसा बाप तशी पोर’ (१९९१), ‘ईश्वर’ (१९८९), ‘नरसिम्हा’ (१९९१) या गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून ते लाइमलाईटपासून दूर होते.