ज्येष्ठ हिंदी व गुजराती अभिनेत्री भैरवी वैद्य यांचे निधन झाले आहे. त्यांनी ६७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. तब्बल ४५ वर्षांपासून अभिनयसृष्टीत कार्यरत भैरवी यांनी आतापर्यंत अनेक हिंदी व गुजराती मालिका तसेच चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्या मागच्या सहा महिन्यांपासून कॅन्सरशी लढत होत्या. याच दरम्यान ८ ऑक्टोबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती समोर आली आहे.
‘मिड डे’ने दिलेल्या वृत्तानुसार, भैरवी गेल्या ६ महिन्यांपासून कर्करोगाने ग्रस्त होत्या. प्रतीक गांधीने भैरवी वैद्य यांच्याबरोबरच्या आठवणींना उजाळा दिला. तो म्हणाला, “मला त्यांच्याबरोबर ‘व्हेंटिलेटर’ चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. आमची चांगली बॉन्डिंग होती. त्या खूप प्रेमळ होता. मी त्यांना लहानपणी स्टेज आणि टेलिव्हिजनवर काम करताना पाहिले होते आणि त्यांच्या कामाचे मला खूप कौतुक वाटायचे. त्यांचा हसरा चेहरा मी कधीच विसरू शकत नाही.”
दरम्यान, अभिनेते बाबुल भावसार यांनी भैरवी वैद्य यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. ते म्हणाले, “खूप वर्षांपूर्वी मी त्यांच्याबरोबर एक नाटक केलं होतं. त्या स्वभावाने खूपच चांगल्या होत्या आणि त्या व्यक्तिरेखाही उत्तम साकारायचा. त्या खऱ्या आयुष्यात भांडल्या तरी आपल्याला वाटायचं की या किती गोड बोलतात. त्या स्वतःचं काम करून निघून जायच्या.”
भैरवी वैद्य यांनी ‘चोरी चोरी चुपके चुपके’, ‘ताल’, ‘व्हॉट्स योर राशी’, ‘हमराज’, ‘क्या दिल ने कहा’ या चित्रपटांमध्ये काम केलं होतं.