Bindu Ghosh Died : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक दुःखद बातमी आली आहे. अभिनेत्री बिंदू घोष (Bindu Ghosh Death) यांचे निधन झाले आहे. त्या ७६ वर्षांच्या होत्या. त्यांनी अभिनेत्री व कोरिओग्राफर म्हणून काम केलं होतं. रविवारी १६ मार्च रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर आज (सोमवारी) अंत्यसंस्कार करण्यता आले. बिंदू घोष तेलुगू व तमिळ चित्रपटांमधील त्यांच्या विनोदी भूमिकांसाठी ओळखल्या जायच्या.
एचटी तमिळने दिलेल्या वृत्तानुसार, बिंदू घोष मागील अनेक वर्षांपासून आजारी होत्या. आरोग्याशी संबंधित विविध समस्यांमुळे त्या अभिनयापासूनही दुरावल्या होत्या. त्यांच्यावर काही काळापासून रुग्णालयात उपचार सुरू होते. आता बिंदू घोष यांच्या मुलांनी त्यांच्या निधनाची पुष्टी केली आहे. निधनाची बातमी समजल्यावर तमिळ कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.
बिंदू यांनी १९६० साली आलेल्या कलथूर कन्नम्मा चित्रपटातून कमल हासन यांच्याबरोबर अभिनयविश्वात पदार्पण केलं होतं. त्यांनी नृत्यांगना म्हणून तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री, एमजी रामचंद्रन आणि जे जयललिता यांच्याबरोबर काही गाण्यांमध्ये काम केलं होतं.
एकेकाळी आपल्या विनोदी भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या बिंदू घोष मागील काही वर्षांपासून वृद्धापकाळाशी संबंधित अनेक समस्यांनी ग्रस्त होत्या. सततचे आजारपण व आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने त्यांना अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागलं. खाण्या-पिण्याच्या वस्तूंसाठीही पैसे नसल्याने त्या विवंचनेत होत्या. काही काळापूर्वी त्यांची हार्ट सर्जरी झाली होती.
मुलांची आर्थिक परिस्थिती नव्हती चांगली
एका मुलाखतीत बिंदू घोष यांनी सांगितलं होतं की, मोठा मुलगा त्यांची काळजी घेऊ शकत नव्हता, त्यामुळे तो त्यांना सोडून गेला आणि धाकट्या मुलाने त्यांची काळजी घेतली. पण धाकट्या मुलाकडे पुरेसे पैसे नव्हते. आर्थिक अडचणींमुळे खूप त्रास होत आहे, असं बिंदू यांनी अनेक मुलाखतीत सांगितलं होतं. अभिनेता बालानेही त्यांना मदत करत ८० हजार रुपये दिले होते. तसेच अभिनेता रिचर्ड आणि रामलिंगम यांनीही मदतीचे आश्वासन दिले होते.
बिंदू घोष यांनी अनेक चित्रपटांमध्ये लहान-मोठ्या भूमिका केल्या. त्यांनी गौंडामणी, सेंथिल, रजनीकांत, प्रभू आणि कमल हासन यांच्याबरोबर काम केलं होतं.