मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू यांची एक्झिट अनेकांच्याच मनाला चटका लावून गेली आहे. वयाच्या ५९ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. रिमा लागू यांच्या कारकिर्दीवर एक नजर टाकली तर विविध धाटणीच्या भूमिकांना त्यांनी न्याय दिल्याचं पाहायला मिळतंय. त्यातही त्यांनी साकारलेली ‘आई’ म्हणजे ममता आणि वात्सल्याचं प्रतिकच जणू.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रिमाताईंनी मराठी चित्रपटांसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतही मोलाचं योगदान दिलं आहे. मुख्य म्हणजे अभिनेता सलमान खानच्या आईच्या भूमिकेत त्यांना प्रेक्षकांनी जास्त पसंती दिली. तसं पाहायला गेलं तर सलमान आणि रिमाताईंच्या वयात फारसं अंतर नाही. पण, त्यांच्या चेहऱ्यावर असणारी मातृत्वाची झाक काही औरच होती. रिमा- सलमानची ही ऑनस्क्रीन आई-मुलाची जोडी इतकी हिट झाली की प्रेक्षक रिमा लागू यांनाच सलमानची खरी आई समजू लागले होते.

‘मैने प्यार किया’, ‘पत्थर के फूल’, ‘साजन’, ‘हम साथ साथ है’ आणि ‘जुडवा’ या चित्रपटांमध्ये रिमा यांनी सलमान खानच्या आईची भूमिका साकारली होती. मुलांच्या कलाने घेणारी, त्यांची गुपितं समजणारी, प्रेमामध्ये साथ देणारी आणि वेळ पडल्यास रागे भरणारी आई रिमा यांनी रुपेरी पडद्यावर साकारली. ‘मैने प्यार किया’ आणि ‘हम आपके है कौन’ या चित्रपटांसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता. ‘हम आपके है कौन’ या चित्रपटामध्ये रिमाताईंनी माधुरी दीक्षितच्या आईची भूमिका साकारली होती. पण, अप्रत्यक्षरित्या त्यांच्या या आईच्या भूमिकेसोबत सलमानचं पात्रही बांधलं गेलं होतं.

वाचा: BLOG : रिमा गिरगावला कधीच विसरली नाही…

सलमानव्यतिरिक्त रिमाताईंनी साकारलेल्या ऑनस्क्रीन आईच्या वात्सल्याचा अनुभव इतरही कलाकारांना मिळाला. ‘आशिकी’ आणि ‘वास्तव’ या चित्रपटातील त्यांच्या अभिनयालाही प्रेक्षकांनी दाद दिली होती. शाहरुख खान, काजोल, संजय दत्त, माधुरी दीक्षित या कलाकारांचं आईपण अनुभवत रिमाताईंनी ‘अल्टीमेट मॉम’ या चित्रपटसृष्टीला देऊ केली. चित्रपटांव्यतिरिक्त रिमाताईंनी टेलिव्हिजन मालिकांमध्येही उल्लेखनीय भूमिका साकारुन प्रेक्षकांची मनं जिंकली होती. अशी ही हरहुन्नरी अभिनेत्री कायमच प्रेक्षकांच्या स्मरणात राहिल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran actress reema lagoo passes away salman khans mother bollywood actress