Seema Deo Death: मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतली सोज्ज्वळ अभिनेत्री अशी ओळख असलेल्या अभिनेत्री सीमा देव यांचं आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सीमा देव यांचा मुलगा अभिनय देव यांच्या घरीच सीमा देव यांचं निधन झालं. दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या त्या पत्नी होत्या. तसंच विविध चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा खास ठसा उमटवला होता. सीमा देव यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी पाच वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘आनंद’ या सिनेमात त्यांनी केलेली भूमिका आजही लोकांच्या स्मरणात आहे. २०२० मध्ये त्यांना अल्झायमर्स या आजाराने ग्रासलं होतं. अभिनेते अजिंक्य देव यांनीच ट्वीट करुन ही माहिती दिली होती. रमेश देव आणि सीमा देव या दोघांकडेही सिनेसृष्टी अत्यंत आदरपूर्वक पाहात होती. आज सीमा देव यांची प्राणज्योत मालवली आहे.

सीमा देव या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री होत्या. त्यांनी आतापर्यंत ८० पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केलं. काही काळानंतर त्यांनी हिंदी चित्रपटांत काम करणे बंद करून केवळ मराठी चित्रपटांत काम करायला सुरुवात केली होती. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळाच ठसा उमटवला. सीमा देव यांचा जन्म मुंबईतील गिरगाव येथे झाला. पुढे त्यांचा विवाह अभिनेते रमेश देव यांच्याशी झाला. अभिनेते अजिंक्य देव आणि दिग्दर्शक अभिनय देव ही त्यांची दोन मुलं आहेत. २०१३ मध्ये रमेश देव आणि सीमा देव यांनी लग्नाचा पन्नासावा वाढदिवस साजरा केला होता. गेल्या वर्षी रमेश देव यांचं निधन झालं. त्यानंतर आज सीमा देव यांचं दीर्घ आजाराने निधन झालं.

सीमा देव यांचं मूळ नाव नलिनी सराफ असं होतं. ‘आलिया भोगासी’ या सिनेमातून त्यांनी १९५७ मध्ये सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर त्यांनी पुढे अनेक हिंदी आणि मराठी सिनेमांंमधून काम केलं. आज अल्झायमर्स या आजाराने त्यांचं मुंबईतल्या जुहूमधल्या घरी निधन झालं. ‘जगाच्या पाठीवर’, ‘मोलकरीण’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘या सुखांनो या’, ‘सुवासिनी’, ‘हा माझा मार्ग एकला’ हे चित्रपट विशेष गाजले. ‘आनंद’ या अत्यंत गाजलेल्या हिंदी चित्रपटातील त्यांची भूमिका आजही कायम लक्षात राहते.

२०१७ मध्ये पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (पिफमधील) पुरस्कार सोहळ्यात त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.


कशी झोकात चालली कोळ्याची पोर जशी चवथीच्या चंद्राची कोर हे त्यांचं गाणं प्रचंड गाजलं होतं. मोलकरीण या सिनेमात हे गाणं होतं. आनंद सिनेमातही रमेश देव आणि सीमा देव या दोघांनी काम केलं होतं. या दोघांची जोडी मराठी सिनेसृष्टीतली एक उत्तम जोडी म्हणून ओळखली जात होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran actress seema dev passes away scj