लेखक, दिग्दर्शक, निर्माता, संगीतकार, नेपथ्यकार आणि चित्रकार अशा विविध भूमिकांमधून सर्जनशील मुशाफिरी करणारे ज्येष्ठ कलाकर्मी पुरुषोत्तम बेर्डे यांचे कलाक्षेत्रातील योगदान मोठे आहे. कलेच्या वेगवेगळया माध्यमातून व्यक्त होताना पुरुषोत्तम बेर्डे यांच्या प्रत्येक कलाकृतीवर त्यांच्या दांडग्या अभ्यासाची आणि सर्जनशीलतेची किनार दिसून आली आहे. अशा या हुकमी दिग्दर्शकाचे ‘सुमी आणि आम्ही’ हे नवं नाटक रंगभूमीवर येतंय. विशेष म्हणजे या नाटकाद्वारे तब्ब्ल ९ वर्षांनी ते नाटयदिग्दर्शन करतायेत. नाटकाच्या संगीत, नेपथ्याची जबाबदारी ही तेच सांभाळणार आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजस प्रोडक्शन्स आणि मायबोली चित्र निर्मित सुमी आणि आम्ही हे नाटक एप्रिलच्या मध्यावर रंगभूमीवर येणार आहे. नाटकाचे निर्माते राजस संजय गोडसे, शैलेश राजे आहेत. राजन मोहाडीकर लिखित पुरुषोत्तम बेर्डे दिग्दर्शित या नाटकात मोहन जोशी, सविता मालपेकर, श्रद्धा पोखरणकर, उदय लागू, राजेश चिटणीस, प्रदीप जोशी, चंद्रशेखर भागवत कलाकार काम करणार आहेत. प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची असून सूत्रधार सुनील महाजन, संदीप विचारे आहेत.

एका कुटुंबाची कथा सांगणारं हे नाटक आहे. आपल्या मुलीचं सुमीचं मिशन पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या आई वडिलांची गोष्ट यात सांगितली आहे. या नाटकाच्या दिग्दर्शना विषयी बोलताना पुरुषोत्तम बेर्डे सांगतात की, “माझं अनेक गोष्टींवर काम सुरू आहे.त्या व्यापात नाट्य दिग्दर्शनासाठी वेळ मिळत नव्हता. राजन मोहाडीकर यांच्या सोबत मी आधी काम केलं होतं. माझ्या कामाची पद्धत त्यांना आवडली आणि या नाटकाची जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली. ही संधी घेत हे नाटक मी करायला घेतलं. बर्‍याच वेगवेगळया माध्यमातून मी नव्या कलाकृती रसिकांसाठी आणणार आहे. सुमी आणि आम्ही ही त्यातील एक कलाकृती असून पारंपरिक बाज असलेलं हे नाटक रसिकांना नक्की आवडेल.”

आजपर्यंत ८ नाटकांचे लेखन, १० नाटकांचे दिग्दर्शन, एकूण ७५ व्यावसायिक नाटकांचे पार्श्वसंगीत, २५ नाटकांचे नेपथ्य, ५० व्यावसायिक नाटकांच्या जाहिरातींची संकल्पना याबरोबरच विविध चित्रपटांचे लेखन, दिग्दर्शन, साहित्यिक लिखाण करीत पुरुषोत्तम बेर्डे यांनी सकस आणि दर्जेदार मेजवानी रसिकांना दिली. पुरुषोत्तम बेर्डे यांचा १९७५ पासून सुरु झालेला हा प्रवास आजतागायत सुरु असून कामाठीपुरा (वेबसिरीज), काला पानी (चित्रपट), थरार..२६ जुलैचा (नाटक), जाऊबाई जोरात द्वितीय (नाटक) अशा विविध आगामी कलाकृती ते रसिकांच्या मनोरंजनासाठी घेऊन येणार आहेत.

चित्रकला, जाहिरात, एकांकिका, नाटक, लेखन दिग्दर्शन, माहितीपट, चित्रपट, जाहिरातपट, वाद्यवृंद, संगीत दिग्दर्शन, नेपथ्य, कलादिग्दर्शन, स्फुट लेखन, व्यक्तिचित्र लेखन, लघुकथा लेखन, नाट्य आणि पटकथा लेखन, व्यंगचित्रे, इव्हेंट्स, आणि मालिका निर्मिती आणि लेखन, एकपात्री स्वकला प्रवास, विविध वाद्य वादन असा कलाप्रवास करणारा हा प्रतिभावान आणि ज्येष्ठ कलाकर्मी कलाप्रांत समृद्ध करत रसिकांना आनंद देतोय.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran director purushottam berde play sumi aani amhi will be the theaters soon scj