‘संवादिनी’वादन करतो? हे कसले भिकेचे डोहाळे? अशा शब्दांत परिचित आणि आप्तांकडून सुरुवातीला अवहेलना झाली. काही वर्षे बिकट आर्थिक परिस्थितीतही राहावे लागले. मात्र तरीही त्यांनी ‘संवादिनी’प्रति असलेली आपली निष्ठा सोडली नाही. सर्वस्व संवादिनीला वाहिले. जिद्द, परिश्रम, आई-वडिलांचा आशीर्वाद आणि नवदुर्गादेवीची कृपा यामुळे पुढे ज्यांनी संवादिनीवादनात आपली स्वतंत्र नाममुद्रा उमटविली, ते ज्येष्ठ संवादिनीवादक ‘पद्श्री’ पं. तुळशीदास बोरकर आजच्या ‘पुनर्भेट’चे मानकरी आहेत.
पं. तुळशीदास बोरकर हे मूळचे गोव्यातील बोरी गावचे. चौथीपर्यंतचे शालेय शिक्षण बोरीमध्ये तर पुढील शिक्षण सावंतवाडी येथे झाले. बोरी गावातील नवदुर्गा मंदिरात लहानपणी त्यांनी कीर्तने-प्रवचने खूप ऐकलेली. पण कीर्तन-प्रवचनात बुवा काय सांगतात यापेक्षा त्यांचे लक्ष बुवांना संगीतसाथ करणाऱ्या ऑर्गन/संवादिनीवादकाकडे, त्यांच्या बोटांकडे जास्त असायचे. आई जयश्रीबाई गाणे शिकलेल्या होत्या. नाटकातूनही काम करत असत. मोठी बहीण नलिनी बोरकर या छोटा गंधर्व यांच्या ‘कलाविकास नाटय़’ संस्थेत काम करत होत्या. त्यामुळे कलेचा वारसा लहानपणापासूनच मिळाला.
मोठय़ा बहिणीसह तेही नाटक कंपनीबरोबर असायचे. त्या वेळचा एक किस्सा सांगताना पं. बोरकर म्हणाले, छोटा गंधर्व यांच्या नाटक कंपनीत विष्णुपंत वष्ट हे ऑर्गनवादक होते. एके दिवशी आम्ही लहान मुले दुपारी खेळत असताना ते आले. दुपारच्या वेळेत कसले खेळता आणि झोपमोड करता असे ओरडून आम्हाला चला जा इथून असे फर्मावले. का, कसे आणि कशासाठी माहिती नाही, पण निघताना वष्ट यांनी मला काय रे पेटी शिकायची आहे का? असा प्रश्न केला आणि मी हो म्हटले व घरी गेलो. पुढच्या आठवडय़ात नाटकाचा नागपूर दौरा होता. तिकडे त्यांनी मला संवादिनी शिकवायला सुरुवात केली. संवादिनीवादनातील पहिली गुरू माझी आई. कारण तिने घरी मला ‘सा रे ग म प..’ धडे संवादिनीवर दिले होते. घराबाहेरील पहिले गुरू हे विष्णुपंत वष्ट. सहा महिने त्यांच्याकडे शिकलो. दररोज १२ ते १४ तास संवादिनीची शिकवणी चालायची. पुढे त्यांनी नाटक कंपनी सोडली आणि स्वत: छोटा गंधर्व यांनी मला शिकवायला सुरुवात केली. तीही गंमतच आहे. पुण्यात आमच्या घराजवळच ते राहायचे. मी त्यांच्या घरी जाऊन बसायचो. सुरुवातीला ते माझ्याशी काहीही बोलायचे नाहीत. नंतर कधीतरी गायला बसले
की मला पेटीवर साथीसाठी बसायला सांगायचे. जवळपास वर्षभरानंतर त्यांनी शिकवायला सुरुवात केली. पुढे त्यांच्याबरोबर संगीतसाथही करण्यासाठी जाऊ लागलो. त्यामुळे पुणे-मुंबई-पुणे अशा फेऱ्या व्हायला लागल्या.
संवादिनीवादनातील अग्रणी पी. मधुकर यांचे संवादिनीवादन पं. बोरकर यांनी लहानपणी ऐकले होते. त्यांच्याकडे शिकायला मिळावे अशी इच्छा त्यांच्या मनात होती आणि ती १९५७ मध्ये पूर्ण झाली. त्या विषयीच्या आठवणीला उजाळा देताना पं. बोरकर म्हणाले, मुंबईत ‘कला मंदिर’नाटय़संस्थेचे गोपीनाथ सावकार यांच्याशी परिचय झाला. तेव्हा दर रविवारी गिरगावातील साहित्य संघात संगीत नाटके होत असत. ‘संगीत सौभद्र’चा प्रयोग होता. छोटा गंधर्व ‘कृष्ण’ आणि हिराबाई बडोदेकर व माझी बहीण या दोघी अनुक्रमे ‘सुभद्रा’ आणि ‘रुक्मिणी’ या भूमिका करत होत्या. मी त्या नाटकात ऑर्गनची साथ करत होतो. तिसरा अंक पार पडला आणि प्रेक्षकांमधून एक जण रंगमंचावर आले. ती व्यक्ती बाबुराव कुमठेकर यांच्या ओळखीची होती. त्यांचे नाव कृष्णराव कुमठेकर होते. ऑर्गनची साथ करणारा हा मुलगा कोण? याचा हात खूप चांगला आहे असे सांगून त्यांनी, ‘मधु’कडे शिकायचे आहे का, असा प्रश्न केला. हे मधू म्हणजे प्रतिभावंत संवादिनीवादक पी. मधुकर. (मधुकर पेडणेकर) त्यांच्याकडे शिकायची इच्छा माझ्या मनात होतीच. मी नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. पुढच्या एका रविवारी मला कुमठेकर पी. मधुकर यांच्या गिरगावातील घरी घेऊन गेले. त्यांनी संवादिनीवादनाच्या ‘गमभन’पासून शिकवायला सुरुवात केली. ते काहीही बोलायचे नाहीत. सुमारे सहा महिने त्यांचा काही संवाद नव्हता. किमान काही शब्द तरी त्यांनी बोलावे, असे मला वाटत होते. जवळपास सहा महिन्यांनतर एके दिवशी शिकवणी झाल्यावर मी जायला निघालो. तेव्हा ते बायकोला म्हणाले, अगं आज तुळशीदासही माझ्याबरोबर जेवणार आहे. त्याचेही पान घे. गुरूंनी माझी एक प्रकारे परीक्षाच घेतली होती. त्यांच्याकडे दहा वर्षे मी संवादिनी शिकलो. त्यांनी खूप भरभरून दिले.
पानशेतच्या धरणफुटीत त्यांचे पुण्यातील घर आणि सर्वस्व वाहून गेले. पं. बोरकर यांच्या धाकटय़ा बहिणीचे यजमान काकोडकर यांनी त्यांना आता पुण्यात काही राहिलेले नाही तर मुंबईला चला असा सल्ला दिला आणि ते मुंबईत आले. नाटकाच्या प्रयोगांना संगीतसाथ सुरू होती. पण त्यातून फारसे अर्थार्जन होत नव्हते. नोकरीसाठीही प्रयत्न सुरू होते. त्या वेळी शामराव मोरे यांच्याकडे पेटीचे ‘टय़ुनिंग’ करण्याचे काम ते शिकले. पुढे पेटीचे टय़ुनिंग करण्याची कामे त्यांच्याकडे येऊ लागली. यातून लालजी देसाई यांच्याशी परिचय झाला. त्या परिचयातून बृहन्मुंबई महापालिकेचे तत्कालीन आयुक्त म. वा. देसाई यांच्याशी ओळख झाली. ते स्वत: हौस म्हणून संवादिनी वाजवीत असत. त्यांच्या घरी नादुरुस्त अवस्थेत असलेला ऑर्गन बोरकर यांनी दुरुस्त करून दिला. त्यानंतर देसाई व बोरकर यांचा परस्पर परिचय वाढत गेला. यातून एके दिवशी म. वा. देसाई यांनी बोरकर यांना आमच्याकडे नोकरी करणार का, असे विचारले. बोरकर यांनाही नोकरीची गरज असल्याने त्यांनी हो म्हटले. अर्ज व अन्य सोपस्कोर पार पडल्यानंतर बोरकर हे मालाडच्या महापलिका शाळेत संगीत शिक्षक म्हणून रुजू झाले. १९७३ ते १९९६ अशा कालावधीत त्यांनी संगीत शिक्षक म्हणून पालिका शाळेत सेवा बजाविली.
नोकरी सांभाळून अनेक संगीत नाटके आणि दिग्गज गायकांना संगीत साथ त्यांनी केली. तसेच स्वत:चे संवादिनीवादनाचे कार्यक्रमही ते करू लागले. त्यांनी संगीतसाथ केलेली संगीत नाटके आणि दिग्गज गायकांना केलेली साथ याची यादीही मोठी आहे. छोटा गंधर्व, ज्योत्स्ना भोळे, जयराम व जयमाला शिलेदार, हिराबाई बडोदेकर, पं. राम मराठे, भार्गवराम आचरेकर, श्रीपादराव नेवरेकर, केसरबाई बांदोडकर, मा. अनंत दामले ऊर्फ नूतन पेंढारकर, भालचंद्र पेंढारकर, पं. वसंतराव देशपांडे, प्रसाद सावकार, अरविंद पिळगावकर, रामदास कामत, रजनी जोशी, विश्वनाथ बागूल, अजित कडकडे आणि अन्य गायक-अभिनेत्यांचा यात समावेश आहे. ‘सौभद्र’, ‘मानापमान’, ‘मृच्छकटिक’, ‘संशयकल्लोळ’, ‘स्वयंवर’, ‘एकच प्याला’, ‘पुण्यप्रभाव’, ‘भावबंधन’, ‘मत्स्यगंधा’, ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘मंदारमाला’, ‘मदनाची मंजिरी’, ‘ययाती देवयानी’, ‘घन:श्याम नयनी आला’, ‘शाकुंतल’, ‘मेघमल्हार’ आणि इतर अशा संगीत नाटकांमधून त्यांच्या ऑर्गनवादनाची जादू रसिक श्रोत्यांनी अनुभवली आणि ऐकली. त्यांनी संगीतसाथ केलेल्या नाटकांच्या प्रयोगांची एकूण संख्या सुमारे आठ ते दहा हजार आहे. पं. बोरकर यांचे संवादिनीवादनाचे पाचशेहून अधिक कार्यक्रमही विविध ठिकाणी झाले आहेत.
शास्त्रीय संगीतातही पं. बोरकर यांनी आपली सेवा दिली. यात छोटा गंधर्व, पं. राम मराठे, हिराबाई बडोदेकर, सरस्वती राणे, बसवराज राजगुरु, पं. मल्लिकार्जुन मन्सुर, पद्मावती गोखले-शाळीग्राम, यशवंतबुवा जोशी, शोभा गुर्टू, पं. उल्हास कशाळकर, देवकी पंडित, डॉ. भारती वैशंपायन, गंगुबाई हनगळ, पं. के.जी. गिंडे, पं. एस.सी. आर. भट, पं. दिनकर कायकिणी, उस्ताद रशिद खान, पं. अजय चक्रवर्ती, व्यंकटेश कुमार, गिरिजा देवी आणि भारतरत्न पं. भीमसेन जोशी (सतत १४ वर्षे) या मान्यवरांचा त्यात समावेश आहे.
ऑर्गन व संवादिनी यातील नेमका फरक समजावून सांगताना पं. बोरकर म्हणाले, संवादिनीत हातपेटी व पायपेटी असे दोन प्रकार आहेत. संवादिनीतील सूर अगदी सहज येतो. ऑर्गनच्या पट्टय़ा/की बोर्ड हा संवादिनीपेक्षा लांब असतो. मोठी माणसे चालताना उगाचच धावत-पळत नाही, पण लहान मूल मात्र धावत-पळत सुटते. नेमका हाच फरक ऑर्गन व संवादिनीत आहे. संवादिनी ही वेगात पळणारी तर ऑर्गन शांत, संथ आहे. आवाजातील/सुरांमधील मोहकता, गांभीर्य हे ऑर्गनमध्ये अधिक आहे. ही दोन्ही वाद्ये वाजविणे म्हटले तर सोपे आणि म्हटले तर अवघड आहे. दोन्हींचे तंत्र समजले व समजून घेतले पाहिजे. दोन्ही वाद्ये वाजविण्यासाठीचे ‘कौशल्य’ ही तुमच्यात असणे गरजेचे आहे. बालगंधर्व यांचा आवाज, त्यांची पट्टी ऑर्गनशी तर दीनानाथ मंगेशकर यांचा गळा पायपेटीशी अधिक मिळताजुळता होता. पूर्वी संगीत नाटकातून ऑर्गनची साथ असायची. आता संगीत नाटकांची संख्याही कमी झाल्याने ऑर्गन वादन कमी झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्य़ातील आडिवरे गावचे उमाशंकर ऊर्फ बाळ दाते यांचा ‘ऑर्गन’निर्मितीचा व्यवसाय आहे. त्यांचा व माझा परिचय असून त्यांच्या कारखान्यात तयार झालेला ऑर्गन अमेरिकेतही गेला आहे. कीर्तन, लोकनाटय़ यातून पायपेटीचा वापर आजही केला जातो. सर्वसाधारणपणे संगीतसाथ करण्यासाठी आज संवादिनीचा (हातपेटीचा) वापर अधिक होतो.
संगीतसाथ करणाऱ्या वादकांना गायकांच्या तुलनेत कमी प्रसिद्धी मिळते हे खरे आहे. पण तुमची स्वत:ची तपश्चर्या, त्या वाद्याचा सखोल अभ्यास, जिद्द आणि मेहनत घेण्याची तयारी असेल तर संगीतसाथ करणाऱ्यालाही सन्मान व प्रतिष्ठा मिळते असेही पं. बोरकर सांगतात. या क्षेत्रात येणाऱ्या तरुण पिढीने किमान पदवीधर असावे. कारण हे क्षेत्र तसे भरवशाचे नाही. त्यामुळे इथे जम बसला नाही तर किमान कुठेतरी नोकरी तरी करता येईल. संवादिनीसाथ केल्यानंतर काही वेळेस वादकांची थोडक्या पैशांवर बोळवण केली जाते. आम्ही तेव्हा व्यवहारी नव्हतो. पण आजच्या तरुण पिढीने मानधनाबाबत व्यवहारी असावे, असा सल्लाही ते देतात. ८३ व्या वर्षांत असलेल्या पं. बोरकर यांनी आता वयोपरत्वे संगीतसाथ, संवादिनीवादनाचे कार्यक्रम, शिकवणी वर्ग कमी केले आहे. पण आजही दररोज संध्याकाळी किमान तासभर ते आवर्जून रियाज करतात.
ज्या संवादिनीमुळे सुरुवातीला अवहेलना झाली त्याच संवादिनीने पुढील आयुष्यात मानसन्मान, यश, प्रसिद्धी, आर्थिक स्थैर्य आदी सर्व काही दिले. अनेक दिग्गज गायक, गुणीजन यांचा सहवास लाभला. ‘पद्मश्री’सह संगीत नाटक अकादमी पुरस्कार, संगीत नाटक अकादमी फेलोशिप मिळाली आणि माझ्या कलेवर राजमान्यतेची मोहर उमटली. आयुष्याच्या या वळणावर मी समाधानी आहे. संवादिनी माझे सर्वस्व आहे, माझा श्वास आहे, असे सांगत संवादिनीवादनातील या ऋषितुल्य व्यक्तीने गप्पांचा समारोप केला.