ज्या संगीतकाराकडून खूप काही शिकलो, त्यांच्या जीवनपटाचा वेध घेणाऱ्या डीव्हीडीचे प्रकाशन माझ्या हस्ते होणे ही खरोखर अविस्मरणीय गोष्ट आहे, अशा शब्दांत प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की यांनी भावना व्यक्त केल्या. ज्येष्ठ संगीतकार व कवी-गीतकार यशवंत देव यांच्यावरील ‘असेन मी नसेन मी’ या तीन डीव्हीडींच्या संचाचे दादर येथील दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सभागृहात पत्की यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन झाले, त्या वेळी ते बोलत होते. सांगली येथील दंतचिकित्सक डॉ. बाळकृष्ण चैतन्य यांच्या ‘चैतन्य मल्टिमीडिया’ची निर्मिती असलेल्या या डीव्हीडी संचाच्या प्रकाशनप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर, पं. सत्यशील देशपांडे, पं. शंकर अभ्यंकर, डॉ. चैतन्य, बंडोपंत सोहोनी, आशा मुळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. कोणताही संगीतकार अन्य संगीतकाराच्या कामाचे सहसा कौतुक करीत नाही, मात्र देवकाका त्याला अपवाद आहेत. ‘राधा ही बावरी’ हे माझे गाणे त्यांनी ‘आकाशवाणी’वर ऐकले, त्यांना ते खूप आवडले, मात्र या गाण्याचा संगीतकार कोण हे त्यांना ठाऊक नव्हते. त्यामुळे त्यांनी ‘आकाशवाणी’वर दूरध्वनी करून त्याबाबत विचारणा केली. या गाण्याचा गीतकार व संगीतकार मी आहे, हे समजल्यानंतर त्यांनी लगेच माझ्याशी संपर्क साधून माझे भरभरून कौतुक केले, त्यांच्याकडून झालेले कौतुक माझ्यासाठी लाखमोलाचा ठेवा आहे, असे पत्की म्हणाले. पाडगावकर यांनी देवांना शुभेच्छा दिल्या व यापुढेही त्यांनी जोमाने संगीतनिर्मिती करावी, असे आवाहन केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा