ज्येष्ठ पंजाबी अभिनेत्री दलजीत कौर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. त्या ६९ वर्षांच्या होत्या. यामुळे सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. दलजीत कौर यांनी अनेक पंजाबी चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. त्यांच्या अभियनामुळे त्या घराघरात पोहोचल्या होत्या. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर सिनेसृष्टीतील अनेक कलाकार हळहळ व्यक्त करत आहेत.
दलजीत कौर यांचे चुलत भाऊ हरिंदर सिंग खंगुरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांपासून त्या ब्रेन ट्युमरने त्रस्त होत्या. गेल्या वर्षभरापासून त्या कोमात गेल्या होत्या. आज सकाळी पहाटेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंजाबी चित्रपटसृष्टीतील ‘हेमा मालिनी’ म्हणून त्यांना ओळखले जायचे.
आणखी वाचा : मुलीच्या लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी प्रसिद्ध पंजाबी गायकाच्या पत्नीचं निधन, दोन दिवसांनी लेकाचंही होतं लग्न
अभिनेत्री निरू बाजवाने हिने याबद्दल इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने दलजीत कौर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. “दलजीत कौर जी तुम्ही एक प्रेरणास्थान आहात. खूप दुख:द बातमी. मला तुमच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली यासाठी मी कृतज्ञ आहे”, असे तिने म्हटले आहे. त्याबरोबर तिने त्यांचा एक फोटोही शेअर केला आहे.
त्याबरोबरच गायक मिका सिंग यांनीही याबद्दल ट्वीट करत श्रद्धांजली वाहिली आहे. “पंजाबची सुंदर अभिनेत्री आणि लिजेंड असलेल्या दलजीत कौर या त्यांच्या सुंदर आठवणी ठेवून निघून गेल्या. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि तिला चिरशांती लाभो, असे मिका सिंग म्हणाले.
आणखी वाचा : “जीवाला हुरहूर लावून…” ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेत्रीच्या मृत्यूनंतर ‘वहिनीसाहेब’ हळहळल्या
दलजीत यांनी दिल्लीच्या लेडी श्री राम कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले होते. त्यानंतर १९७६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दाज’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. कौर यांनी ‘पुट्ट जट्टन दे’ (१९८३), ‘मामला गद्दल है’ (१९८३), ‘की बनू दुनिया दा’ (१९८६), ‘पटोला’ (१९८८) आणि ‘सईदा जोगन’ (१९८८) यासह अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले.
दलजीत कौर यांनी ‘दाज’, ‘गिधा’, ‘पुट्ट जट्टन दे’, ‘रूप शकीनन दा’, ‘इशाक निमाना’, ‘लाजो’, ‘बटवारा’, ‘वैरी जट्ट’, ‘पटोला’ आणि ‘जग्गा डाकू’ या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या होत्या. दलजित कौर अभिनयासोबत हॉकी आणि कबड्डी या खेळातही पटाईत होत्या.