भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचे रविवारी निधन झाले. वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्रकृती बिघडल्याने गेल्या काही दिवसांपासून लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.
लतादीदी यांच्या वडिंलाच्या निधनानंतर त्यांनी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. त्यांनी लहानपणापासूनच खूप संघर्ष केला. लतादीदी लहान असतानाच त्यांच्या आयुष्यात तीन वेदनादायक महिने आले, ज्यामुळे आपण आता तिला गमावू, असे त्यांच्या कुटुंबियांना वाटले होते. पण लतादीदींना वाचवण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी कोणतीही कसर सोडली नव्हती.
प्रसिद्ध लेखक हरीश भिमाणी यांनी त्यांच्या ‘इन सर्च ऑफ लता मंगेशकर’ या पुस्तकात लतादीदींशी संबंधित हा किस्सा लिहिला आहे. यात त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लतादीदी या ५ वर्षांच्या असताना त्याना कांजण्याचे निदान झाले होते. त्यावेळी त्यांच्या शरीरावर फार मोठ्या प्रमाणात कांजण्या आल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियातील अनेकांना आता ती जगणार नाही, असे वाटले होते.
Lata Mangeshkar Passes Away : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं निधन
त्यांच्या कांजण्यामध्ये पू जमा झाला होता. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती बिघडत चालली होती. त्यांना प्रचंड वेदना होत होत्या. त्यांच्या आईने त्यांना केळीच्या पानात गुंडाळून ठेवले होते. या आजारादरम्यान त्यांची दृष्टी जाईल, अशी भीती डॉक्टरांना होती. कांजण्याच्या या आजाराने लतादीदींना तब्बल तीन महिने ग्रासले होते. हे तीन महिने त्यांच्या आयुष्यातील सर्वात वेदनादायी महिने ठरले. पण हळूहळू त्यांची प्रकृती सुधारत गेली. हा एखादा पुनर्जन्म असल्याचे अनेकांनी म्हटले.
लता ही पूर्णपणे बरी झाली आहे, हे कळताच त्यांच्या वडिलांनी बँडवाल्यांना बोलावले होते. तर त्यांच्या आईंनी धान्य, नारळ आणि महागड्या साड्यांचे वाटप केले होते. त्यावेळी त्यांच्या घरात उत्सवाचे वातावरण होते.
दरम्यान भारताच्या गानकोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांचे आज निधन झाले आहे. त्या ९२ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून प्रकृती ठीक नसल्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र आज सकाळी उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. लतादीदींच्या निधनामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे. राष्ट्रपती, पंतप्रधानांपासून सर्वच स्तरातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.