दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीसाठी एक वाईट वृत्त समोर येत आहे. ज्येष्ठ तेलुगू अभिनेते कैकला सत्यनारायण यांचे २३ डिसेंबर रोजी सकाळी त्यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी निधन झाले आहे. वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला असून, काही महिन्यांपासून ते आरोग्याच्या अनेक समस्यांशी झुंज देत होते. सत्यनारायण यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली. त्यांच्यावर अंतिम संस्कार उद्या, २४ डिसेंबर रोजी महाप्रस्थानम येथे होणार आहेत.
प्रसिद्ध निर्माते वामसी शेखर यांनी ट्विटरच्या माध्यमातून कैकला सत्यनारायण यांच्या निधनाची बातमी दिली आहे. सत्यनारायण यांनी १९६० मध्ये नागेश्वरम्मा यांच्याशी लग्न केले. त्यांना दोन मुली आणि दोन मुलं आहेत. सत्यनारायण यांच्या निधनाने तेलुगू चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. चाहते आणि सेलिब्रिटी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना भावूक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत.
आणखी वाचा : “जर त्यांना चूक सापडली असती..” लेखक मनोज मुंतशीर यांची ‘बेशरम रंग’ गाण्याच्या वादावर टिप्पणी
कैकला सत्यनारायण हे तेलुगू चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रगल्भ अभिनेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी ७७० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. महेश बाबू ते एनटीआर आणि यश या तरुण कलाकारांबरोबरही त्यांनी काम केले आहे. अभिनयाबरोबरच त्यांनी निर्मितक्षेत्रातसुद्धा त्यांचं योगदान दिलं आहे. तेलुगू ब्लॉकबस्टर चित्रपट KGF चेदेखील त्यांनीच वितरण केले होत.
१९९६ मध्ये त्यांनी मछलीपट्टणममधून विभागातून खासदार म्हणूनदेखील काम केले. गेल्या वर्षीही श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने सत्यनारायण यांना हैदराबादच्या अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळीही त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले होते. त्यांच्या निधनाबद्दल समजताच दाक्षिणात्य कलाकारांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. शोक नंदामुरी कल्याणराम, नानी, राम चरण या कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.