ज्येष्ठ मराठी अभिनेते चंद्रकांत पंढरीनाथ कोळी यांचे निधन झाले आहे. ते ७५ वर्षांचे होते. बऱ्याच दिवसांपासून ते आजारी होते, त्यामुळे काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते; याचदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. सायन-कोळीवाडा येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. चंद्रकांत कोळी यांच्या पश्चात पत्नी, सून व नातवंडे असा परिवार आहे.
हेही वाचा- अयोध्येत पोहचले ‘रामायण’ मालिकेतील ‘राम’, ‘लक्ष्मण’ आणि ‘सीता’, स्वागताचा व्हिडीओ व्हायरल
मराठी नाट्य संगीत क्षेत्रात चंद्रकांत कोळी यांचे नाव मोठे होते. आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक अजरामर भूमिका साकारल्या. ‘ संगीत कट्यार काळजात घुसली’ या प्रसिद्ध मराठी नाटकामध्ये त्यांनी चाँद नावाची व्यक्तीरेखा साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला होता. या नाटकाचे त्यांनी ६०० हून अधिक प्रयोग केले होते. इथून नाट्यसंगीताचा त्यांचा सुरू झालेला प्रवास ‘संगीत घालीण लोटांगण’ पर्यंत सुरू होता.
आपल्या कारकिर्दीत त्यांनी २५ हून अधिक नाटकांमध्ये अजरामर भूमिका साकारल्या होत्या. ४० ते ४५ वर्षांच्या नाट्यप्रवासात त्यांनी नाटकांचे पाच हजारांपेक्षा अधिक प्रयोग व हजारांहून अधिक नाट्य व भक्ती संगीताचे प्रयोग केले. तसेच ‘अवघा रंग एक झाला’ या नाटकात त्यांनी साकारलेली प्रसाद सावकार ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली. महानगरपालिका शाळेतून शिक्षक पदावरून निवृत्त झाल्यावर त्यांनी नाटक आणि विद्यार्थ्यांच्या जडणघडणीवर लक्ष केंद्रित केले होते.