Shirish Kanekar Died : ज्येष्ठ लेखक, पत्रकार आणि कथाकथनकार शिरीष कणेकर यांचं निधन झालं. वयाच्या ८० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. सकाळी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना मुंबईतल्या हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिथे हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांचं निधन झालं. सिनेमा, क्रिकेट आणि राजकारण या विषयांवर त्यांचं लेखन प्रसिद्ध होतं. माझी फिल्लमबाजी, कणेकरी ही पुस्तकं आणि कथाकथनाचे त्यांचे कार्यक्रम प्रसिद्ध झाले होते. आपल्या खास शैलीतून टोकदार लिखाण करणाऱ्या आणि समस्यावर विनोदी शैलीतून बोट ठेवणारे लेखक शिरीष कणेकर हे आता काळाच्या पडद्याआड गेले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंडियन एक्प्रेस, डेली, फ्री प्रेस जर्नल, सिंडिकेटेड प्रेस न्यूज एजन्सी यासाठी शिरीष कणेकरांनी काम केलं. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, सामना, पुढारी, साप्ताहिक मनोहर, साप्ताहिक लोकप्रभा, साप्ताहिक प्रभंजन, पाक्षिक प्रभंजन, पाक्षिक चंदेरी, साप्ताहिक चित्रानंद, सिंडिकेटेड कॉलम, द डेली या सगळ्या वृत्तपत्रांसाठी त्यांनी स्तंभलेखन केलं आहे.

‘यादो की बारात’, ‘शिरीषासन’, ‘सिनेमाबाजी’, ‘मुद्दे आणि गुद्दे’, ‘चहाटळकी’, ‘सूर पारंब्या’, ‘कणेकरी’, ‘लगाव बत्ती’, ‘आसपास’, ‘मेतकूट’, ‘चित्ररुप’, ‘फिल्लमबाजी’, ‘कल्चर व्हल्चर’ या नावांनी ते स्तंभलेखन करत. ‘कधीही दारु न प्यायलेला बेवडा’ या शीर्षकाने त्यांनी लिहिलेला केश्तो मुखर्जींवरचा लेख आजही लोकांच्या स्मरणात आहे. तसंच दिलीप कुमारचं वर्णन हे ‘बादशाह हा शेवटी बादशाहच’ असतो या शब्दांमध्ये त्यांनी केलं होतं. तिरकस लिहणं आणि जोरकसपणे मुद्दे मांडणं हे त्यांच्या लेखन शैलीचं वैशिष्ट्य. क्रिकेट, मनोरंजन विश्व आणि राजकारण हे तिन्ही त्यांचे आवडीचे विषय होते.

‘लगाव बत्ती’ या शिरीष कणेकर यांच्या कथा संग्रहाला महाराष्ट्र साहित्य परिषदेचा आणि उत्कृष्ट विनोदी वाड्मयाचा चिं.वि. जोशी पुरस्कारही मिळाला होता. रायगड जिल्ह्यातील पेण हे शिरीष कणेकर यांचं मूळ गाव. त्यांचे वडील रेल्वे रुग्णालयात डॉक्टर होते. त्यामुळे भायखळ्याच्या रेल्वे रुग्णालयाच्या सरकारी निवासस्थानात त्यांचं बालपण गेलं. शिरीष कणेकर हे मराठीतील ज्येष्ठ लेखक, पत्रकार आणि कथाकथनकार होते. क्रीडा आणि सिने-पत्रकारितेवर त्यांनी विपुल लेखन केलं आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran writer shirish kanekar passes away at mumbais hinduja hospital scj
Show comments